मुंबई : अधेंरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. आधी शिवसेना (Shiv Sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर लटके यांचा राजीनामा बीएमसीने मंजूर केला. शुक्रवारी लटके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आता ठाकरे गटाकडून भाजपाचे (BJP) उमेदवार मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेण्यात आला आहे. माजी नगरसेवक संदीप नाईक यांनी आक्षेप घेतला आहे.
ठाकरे गटाकडून अंधेरी पूर्व विधासभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उभे केलेले उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आला आहे. माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून हा आक्षेप घेण्यात आला आहे. ‘मुरजी पटेल यांनी गुन्हाची माहिती लपवली’, असा आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. पटेलांविरोधात काही पुरावेही निवडणूक आयोगाला देणार असल्याचं नाईक यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी आपला उमदेवारी अर्ज दाखल केल्यानंतर आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यांनी आज सकाळी गणपतीचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. लटके साहेब देखील सर्वप्रथम गणेशाचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात करायचे असं यावेळी ऋतुजा लटके यांनी सांगितलं. आम्ही देखील आधी गणपतीचं दर्शन घेतलं आहे, त्यानंतर प्रचाराला सुरुवात करत आहोत असं त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान मला विजयाची खात्री वाटते. निष्ठावंत शिवसैनिक माझ्यासोबत आहे. मी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले होते तेव्हा जमलेली गर्दीच सर्व काही सांगून जाते. असं लटके यांनी म्हटलं आहे.