मुंबई : राज्यसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला भाजपनं धक्का दिला. त्यानंतर आता विधान परिषद निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची झाली होती. या निवडणुकीतही महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) पुन्हा धक्का बसला. भाजपचे प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड हे पाचही उमेदवार निवडून आले. शिवसेनेचे सचिन अहीर आणि आमशा पाडवी, राष्ट्रवादी काँग्रेसचे रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे विजयी झाले. परंतु, काँग्रेसचे पहिल्या क्रमांकाचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे (Chandrakant Handore) यांचा पराभव झाला. आघाडीची सुमारे 20 मतं खेचण्यात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना यश आलं. मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे ठाकरे दिवस फिरले अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी ट्विटवरून दिली.
ठाकरेंचे दिवस फिरले…
हे सुद्धा वाचा— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 21, 2022
नीलेश राणे हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपूत्र आहेत. राणे पिता-पुत्र हे ठाकरे घराण्याच्या विरोधात नेहमी बोलत असतात. आतापर्यंत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. परंतु, आता त्यांचे दिवस फिरले आहेत. कारण त्यांचे जवळचे सहकारी एकनाथ शिंदे हे 33 आमदारांना घेऊन गुजरातला रवाना झालेत. सूरतमध्ये भाजपच्या नेत्यांनी त्यांची व्यवस्था केली. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे हे भाजपमध्ये जाऊ शकतात. एकीकडं राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार निवडून आणता आला नाही. दुसरीकडं चंद्रकांत हांडोरे यांचा महाविकास आघाडी एकत्र असताना पराभव झाला. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड करण्याच्या तयारीत दिसतात. एकंदरीत ठाकरे यांचे दिवस फिरले आहेत, असं ट्विट नीलेश राणे यांनी केलंय.
या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, एकनाथ शिंदे हे शिवसेनेशी एकनिष्ठ आहेत. ते शिवसेना सोडणार नाहीत. याशिवाय त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी संपर्क सुरू आहे. त्यांनी असं सांगितलं की, ते लवकरच परत येतील. गुजरातमध्ये या आमदारांची घेराबंदी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नीलेश राणे यांनी केलेलं ट्वीट हे चर्चेत आलं आहे. खरोखरच ठाकरेंचे दिवस फिरले काय ते येणारा काळाच ठरवेल. कारण अद्याप कोणत्याही प्रकारचे चित्र स्पष्ट झालेलं नाही.