कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कोल्हापूरमधील बडे नेते आणि माजी मंत्री, आमदार हसन मुश्रीफ ( NCP LEADER HASAN MUSHRIF ) यांच्या कागल ( KAGAL ) येथील निवासस्थानी ईडी ( ED ) आणि आयकर विभागाच्या ( INCOM TAX ) अधिकाऱ्यांनी आज सकाळी साडे सहा वाजता धाड टाकली. कोल्हापूर ( KOLHAPUR ) थंडीने गारठले असतानाच स्थानिक पोलिसांना माहिती न देताच दिल्ली पोलीस ( DELHI POLICE ), ईडी अधिकारी मुश्रीफ यांचे निवासस्थान विचारत त्यांच्या घरी पोहोचले आणि पहाता पहाता त्यांनी मुश्रीफ यांच्या घराला वेढा घातला. दुसरीकडे, मुश्रीफ यांचे समर्थक माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावरही काही अधिकारी पोहोचले होते. या अधिकारी आणि पोलिसांच्या गाडीचे पासिंग दिल्ली येथील असल्याची माहिती मिळत आहे.
हसन मुश्रीफ 1999 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले. त्यानंतर राज्यमंत्री, कामगार मंत्री असा त्यांचं प्रवास राहीला आहे. मितभाषी आणि सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. विरोधी पक्षाचे नेतेही त्यांच्या या कार्याने प्रभावित आहेत. 2009 साली मिरज इथे जातीय दंगल झाल्या. पश्चिम महाराष्ट्रात त्याचे मोठे पडसाद उमटले. पण, मुस्लीम असूनही येथील जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली आणि ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. 2014 च्या मोदी लाटेतही त्यांनी कोल्हापूरचा गड कायम राखला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिली होती. मात्र, शरद पवार हेच माझे गुरु आहेत अशी श्रद्धा आणि निष्ठा दाखवत मुश्रीफ यांनी ती ऑफर धुडकावून लावली होती.
चंद्रकांत पाटील यांची ऑफर धुडकावल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात 25 जुलै 2019 रोजी हसन मुश्रीफ यांच्या घरावर आयकर विभागाने पहिला छापा टाकला. मुश्रीफ यांच्या घरासह, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, पुणे येथे राहणाऱ्या त्यांच्या मुला-मुलींचे घर, टाकाळा येथे रहाणारे त्यांचे साडू या त्यांच्या निकटवर्तीय यांच्या घरावरही आयकर विभागाने छापे टाकले होते. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची कोंडी केली जात असल्याचा आरोप झाला होता.
भाजपशी फारकत घेत उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेत राज्यात सत्ता स्थापन केली. हा घाव भाजपच्या जिव्हारी लागला. तर, दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमैया यांनी महाआघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढण्यास सुरवात केली. राष्ट्रवादीचे मंत्री अनिल देशमुख, नवाब मलिक, हसन मुश्रीफ, शिवसेनेचे मंत्री अनिल परब, खासदार संजय राऊत, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे नेते सोमैया यांच्या रडारवर होते.
सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर 127 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला. त्याला मुश्रीफ यांनी 100 कोटींचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगत प्रत्युत्तर दिले होते. मात्र, सोमय्या यांनी आपल्याकडे याचे सर्व पुरावे आहेत. ते लवकरच ईडीकडे सादर करू असे जाहीर आव्हान दिले होते. मुश्रीफ यांनी बेनामी संपत्ती गोळा केली असून त्यांनी मनी लाँड्रिंग, बोगस कंपन्याच्या माध्यमातून अनेक गैरव्यवहार केले आहेत. यात पत्नी साहिरा मुश्रीफ, त्यांचा मुलगा नाविद मुश्रीफ यांचाही सहभाग आहे. त्याचे 2700 पानी पुरावे माझ्याकडे आहेत, असे सोमय्या म्हणाले होते.
ठाकरे-पवार सरकार आपल्या मंत्र्याच्या घोटाळ्याची चौकशी करणार नाहीत. कारण, हे सरकारच घोटाळेबाज आहे. एक घोटाळेबाज दुसऱ्या घोटाळेबाजाला वाचवत आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली होती. त्यानंतर काही महिन्यातच पुन्हा शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आले आणि सोमैया यांनी पुन्हा एकदा या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. त्यांनी याची चौकशी करण्याचे आश्वासन सोमैया यांना दिले आणि आज मुश्रीफ यांच्या घरी ईडी, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाडी टाकल्या. त्यामुळे या धाडी मागील खरा सूत्रधार किरीट सोमैया हेच असल्याचे निष्पन्न झाले आहे.