रत्नागिरी : खासदारांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत (Shiv Sena) शिवसेनेला जय महाराष्ट्र करीत (Eknath Shinde) शिंदे गटात प्रवेश केला जात आहे. तर दुसरीकडे पक्ष संघटनसाठी शिवसेनेकडूनही सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर देखील कारवाई केली जात आहे. (Ratnagiri) रत्नागिरीमध्ये आ. उदय सामंत यांच्या संपर्कात असणाऱ्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करुन नवीन नियुक्ती करण्यात आली होती. पण नवनियुक्त सदस्यांनीही पदभार स्विकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे अवघ्या 24 तासांमध्ये पुन्हा नवीन नियुक्ती करण्याची नामुष्की पक्षावर ओढावली आहे. एकीकडे बंडखोरीचे प्रमाण वाढत आहे तर दुसरीकडे पक्षात सहभागी होण्याबाबत पदाधिकाऱ्यांमध्ये द्विधा मनस्थिती आहे.
राज्यात ज्याप्रमाणे शिवसेनेला गळती लागली आहे तीच स्थिती रत्नागिरी जिल्ह्यात देखील झाली आहे. आ. उदय सामंत यांच्या संपर्कात शिवसेनेतील पदाधिकारी गेले होते. त्यावरुन त्यांची पक्षाने हकालपट्टी केली. शिवाय पक्षावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही हे दाखवून देण्यासाठी नवनियुक्ती करण्यात आली होती. मात्र, नियुक्त केलेल्या सदस्यांनी पदभार स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे पक्षापुढे नवा पेच निर्माण झाला होता. ओढावलेल्या परस्थितीवर मात करण्यासाठी शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख पदी सुजित किर यांची उपजिल्हा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाचे झालेले नुकसान आता भरुन निघणार का हे पहावे लागणार आहे.
कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. पण याच कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे सदस्य पद स्विकारण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. पक्ष संघटन आणि नव्याने सुरवात या उद्देशाने शिवसेनेकडून सदस्यांची नवनियुक्ती करण्यात आली होती. पण कौंटुंबिक आणि आरोग्याचे कारण देत शिवसेनेच्या प्रकाश रसाळ यांनी पदभार स्विकारण्यासाठी दिला होता नकार दिला. शिवाय सदस्यही आ. उदय सामंत यांच्या संपर्कात होते. त्यामुळे नेमलेली जिल्हा कार्यकरणी रद्द करुन पुन्हा नवनियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरीमध्ये शिवसेना डॅमेज कंट्रोल करण्यात यशस्वी होणार का हे पहावे लागणार आहे.
पक्ष विरोधी भूमिका घेणाऱ्यांवर कारवाईचा बडगा हा शिवसेनेने कायम ठेवलेला आहे. त्याचनुसार रत्नागिरीमध्ये बंडखोर आ. उदय सामंत यांच्या संपर्काच असेलेले उपजिल्हाप्रमुख बाबू म्हाप, शिवसेना शहर प्रमुख बिपीन बंदरकर आणि महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे नवनियुक्तीचा निर्णय झाला पण त्या सदस्यांनीही थेट पदभार स्विकारण्यास नकार दिला. त्यामुळे 24 तासांमध्ये दोनदा सदस्यांची नियुक्ती करण्याची नामुष्की शिवसेनेवर ओढावली आहे.