कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागेवर विधानपरिषदेवर जाण्याच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सुरु असलेला वाद अखेर मिटला (Raju Shetty MLC) आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या व्यापक हितासाठी स्वाभिमानी शेतकरी एकसंघ ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी राजू शेट्टी यांनी आयोजित केलेल्या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाराज प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील आणि सावकार मादनाईक याची नाराजी दूर करण्यात (Raju Shetty MLC) आली.
शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीतील गोविंद बाग या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. या भेटीत राष्ट्रवादीच्या जागेवर राजू शेट्टी विधान परिषदेवर जाणार यावर शिक्कामोर्तब झाला. या भेटीच्या वळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि इतर काही नेतेही होते. विशेष म्हणजे याआधी (11 जून) राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी देखील राजू शेट्टी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान या दोघांमध्ये विधान परिषदेच्या जागेवर चर्चा झाली होती. यावेळी जयंत पाटील यांनी अंतिम निर्णय शरद पवार आल्यावर घेऊ असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर राजू शेट्टी यांनी घेतलेल्या पवारांच्या भेटीत राजू शेट्टी यांची विधानपरिषदेवरील वर्णी निश्चित झाली.
राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोट्यातून माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. राजू शेट्टी यांचे नाव विधानपरिषदेसाठी निश्चित झाल्यावर ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’तील काही नेते नाराज झाले. यानंतर राजू शेट्टी देखील उद्विग्न झालेले पाहायला मिळाले. “अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. घरच्या कटारीचे घाव जिव्हारी लागतात. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच” अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली. यानंतर स्वाभिमानी संघटनेत या मुद्द्यावर दोन गट पडले. मात्र, अखेर हा वाद चर्चेतून मिटवण्यात आला आहे.
राजू शेट्टी काय म्हणाले होते?
“राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. महावीर अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले.” असे राजू शेट्टी म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
संबंधित व्हिडीओ :