मराठी भाषेला उतरती कळा; भाजप आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

| Updated on: Jun 19, 2022 | 10:54 AM

शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनानिमित्त भाजपचे आमदार अमीत साटम यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच बाळासाहेबांच्या पश्चात मराठी भाषेला उतरती कळा लागल्याचे सांगत शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे.

मराठी भाषेला उतरती कळा; भाजप आमदाराचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन सोहळा
Follow us on

मुंबई : शिवसेनेचा (Shivsena) आज 56 वा वर्धापन दिन सोहळा आहे. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दुपारी 12 वाजता शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. हा सोहळा पवई येथील वेस्टिन हॉटेलच्या सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होईल. आज शिवसेनेचा वर्धापन दिनाचं औचित्य साधून भाजपचे आमदार अमीत साटम यांनी पत्राद्वारे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. यापत्रात त्यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पश्चात मराठी भाषेला उतरती कळा लागल्याचे सांगत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. त्यांनी या पत्रात लिहलं आहे.

मा. उद्धव ठाकरेजी
सर्वप्रथम आपणास हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या उद्धारासाठी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या 56 व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा.

पण बाळासाहेबांच्या पश्चात महाराष्ट्राची मायबोली असलेल्या ‘मराठी’भाषेला आज उतरती कळा लागली आहे.

हे सुद्धा वाचा

खासकरून स्वत:ला मराठी रक्षक म्हणून घेणाऱ्या सत्ताधारी सेनेच्या ताब्यात असलेल्या मुंबई महानगर पालिकेच्या शाळांना टाळं ठोकण्यात येत आहे.

‘रोज मरे त्याला कोण रडे?’ हाच दृष्टीकोनातून सत्ताधारी सेनेचा मराठी शाळांबाबत आहे का?

गेल्या वर्षी मी पत्र व्यवहार करुन आपले लक्ष या विषयाकडे वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यावर न प्रतिक्रिया आली न कारवाई झाली.

2012-13  मध्ये 385 मराठी शाळा होत्या. 81 हजार 126 विद्यार्थी होते. 2021-22 मध्ये शाळा फक्त 272 उरल्यात आणि 34,014 विद्यार्थ्यी तिथं शिक्षण घेतायेत.

म्हणजेच गेल्या 10 वर्षात 110 मराठी शाळांना टाळं लागलं आहे. ४७ हजार २०२ विद्यार्थ्यांवर शाळा सोडण्याची वेळ आल्याची माहिती समोर येतीये..

एकीकडे सत्ताधारी सेना मराठी अस्मितेच्या बाता करून सत्तेचा मेवा उपभोगत आहे आणि दुसऱ्या बाजूला मराठी शाळांची व विद्यार्थ्यांची संख्या 50 टक्क्यांनी घसरतीये.

मी आशा करतो की तुम्ही मराठी शाळांच्या परिस्थितीची गंभीर दखल घ्याल जेणेकरून भविष्यात आपल्याला वर्धापन दिन हा “foundation day” म्हणून साजरा करण्याची वेळ येणार नाही.
“जय महाराष्ट्र”

असं भाजपचे आमदार अमीत साटम यांनी पत्राद्वारे म्हटलं आहे.