औरंगाबाद : (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सोमवारी मंत्री संदीपान भुमरे यांच्या मतदार संघात जाहिर सभा होणार आहे. आतापर्यंतच्या अडीच महिन्याच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक ठिकाणी (Rally) सभा घेतल्या अन् मैदानही गाजवले. पण (Paithan) पैठणच्या सभेची गोष्टच न्यारी आहे. कारण यापूर्वी मंत्री झाल्यानंतर प्रथमच संदीपान भुमरे हे मतदार संघात दाखल झाले होते. त्यावेळी सभेतील रिकाम्या खुर्च्यांचे फोटो तुफान व्हायरल झाले होते. त्यामुळे आता पैसे देऊन सभेला बोलावले जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे यांनी केला होता. यावर भुमरेंचे चिरंजीव यांनी सडेतोड उत्तर दिले असून पैसे देण्याची आवश्यकता नाहीतर मुख्यमंत्र्याच्या सभेसाठी जनताच उत्सुक असल्याचे ते म्हणाले आहेत.
मंत्री संदीपान भुमरे हे बंडापासूनच चर्चेत राहिलेले आहेत. त्यानंतर मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ते प्रथमच पैठणमध्ये दाखल झाले होते. छोट्याखानी त्यांचा सत्कार कार्यक्रमही पार पडला, पण यावेळी नागरिकांची गर्दी नव्हती. शिवाय कार्यक्रमस्थळातील खुर्च्याही रिकाम्याच होत्या. आता उद्या मुख्यमंत्री यांची सभा याच मतदार संघात होत आहे. याकरिता पैसे देऊन नागरिकांना आमंत्रण दिले जात असल्याचा आरोप आंबादास दानवे यांनी केला आहे. त्यामुळे ही सभा चांगलीच चर्चेत आली आलीय.
ज्या मतदार संघात आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली तिथे शिंदे गटाची सभा ही ठरलेलीच आहे. त्या अनुषंगाने उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पैठणमध्ये दाखल होणार आहेत. शहरातून रॅली आणि नंतर ते नाथाच्या दर्शनाला जाणार असल्याचे संदीपान भुमरे यांचे चिरंजीव विलास भुमरे यांनी सांगितले आहे.
जनतेमध्ये राहणारे मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे पैठणकरांनाही याबाबत उत्सुकता असल्याचे विलास भुमरे यांनी सांगितले आहे. दुपारी 2 वाजता सभा होणार असून या सभेला तालुक्यातूनच नव्हे तर औरंगाबादसह मराठवाड्यातून नागरिक दाखल होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषद आणि नगरसेवकांच्या मतावर आंबादास दानवे हे आमदार झालेले आहेत. त्यांना जनतेमध्ये राहण्याची सवय नाही. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे विलास भुमरे यांनी सांगितले. पैठणमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा होत असल्याने विरोधकांना पोटसुळ उठला आहे. त्यामुळे असे आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले.