मुंबई | 1 मार्च 2024 : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये फूट पाडल्यानंतर अजित पवार यांनी स्वतंत्रगट स्थापून महायुतीत उपमुख्यमंत्री पद मिळविले. त्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देखील दिले. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी टीव्ही 9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये मुलाखत दिली आहे. शरद पवार यांच्या नंतर पहिली निवडणूक येत आहे. यास कसं सामोरे जाणार या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीत आता अजितपर्व सुरु झाल्याचे म्हटले आहे.
राष्ट्रवादीत भली मोठी फूट होऊन 53 पैकी तब्बल 43 आमदारांची अजितदादा पवारांना साथ मिळाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्षांनी दिला आहे. अर्थात या निकालाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला नवीन नाव आणि चिन्ह देखील देण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानंतर आता शरद पवार गटाला नवे नाव आणि तुतारी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटातील अनेकजण अजित पवारांच्या नेतृत्व मानायला तयार आहेत. ज्याला कुणाला यायचं असेल त्यांनी यावे असे आवाहनच सुनील तटकरे यांनी केले आहे.
आम्ही अजितदादांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणूक लढविणार असून पूर्ण ताकदीने निवडणूकीला सामोरे जाणार आहे. घड्याळ तेच आहे, घड्याळ तेच पण वेळ नवी आहे. अजितदादांच्या अनेक वर्षांच्या मेहनतीतून आम्ही उभे राहत आहोत. राज्यात अजितदादांबद्दल विश्वास निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीत आता ‘अजितपर्व’ सुरू होऊ शकते. आमचे कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. दादांच्या नेतृत्वातील पहिली निवडणूक लढताना स्ट्रायकिंग रेट 100 टक्के सुरू ठेवणार आहोत. राष्ट्रवादीत आता अजित पर्व सुरू झालं आहे असे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. बारामती लोकसभा निवडणूक सुनेत्रा पवारच लढविणार आहेत. महायुतीत कोणती अडचण नाही. जागा वाटपात कोणतीही अडचण येणार नाहीय. महायुतीचे लोकसभेच्या 45 हून अधिक जागा जिंकण्याचं उद्धिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.