कल्याण : (Shivsena) पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे रोज नवे उपक्रम घेऊन पदाधिकारी, नगरसेवक आणि आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. असे असताना दुसरी शिवसेनेला लागलेली गळती ही कायम आहे. गेल्या दोन दिवसांपासून आमदारांचे बंड हे काही प्रमाणात का थंड झाले असले तरी हे बंडाचे लोण (Corporator) नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांपर्यंत येऊन ठेपले आहे. नवी मुंबई, पुणे पाठोपाठ आता कल्याण-डोंबवली महापालिकेतील तब्बल 55 पेक्षा जास्तीच्या नगरसेवकांनी बंड केले आहे. हे नगरसेवक आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यामुळे केवळ आमदारच नाहीतर आता नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना रोखण्याचे आव्हान ठाकरेंच्या समोर असणार आहे.
नवी मुंबई, ठाणे नंतर आता कल्याण-डोंबवली येथील नगरसेवकांनी आपला पाठिंबा हा शिंदे गटाला असल्याचे जाहीर केले आहे. तर दुसरीकडे शहर प्रमुख राजेश मोरे देखील शिंदे गटात सहभागी झाल्याचे समजत आहे. त्यामुळे बंडखोरीचे लोण आता स्थानिक पातळीवरही पाहवयास मिळत आहे. केवळ आमदार, खासदार नाहीतर नगरसेवक आणि पदाधिकारी देखील उद्धव ठाकरे यांची साथ सोडत असल्याचे चित्र आहे.
राज्यातील महापालिका निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. असे असताना शिवसेनेला जय महाराष्ट्र करणाऱ्या आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. दिवसाकाठी शेकडो नगरसेवक हे पक्ष सोडून शिंदे गटात सहभागी होत आहेत. कल्याण-डोंबवली महापालिकेतील तब्बल 55 हून अधिक नगरसेवक हे शिंदे गटात सहभागी झाले आहेत.
नगसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असला तरी त्याची घोषणा ही शनिवारी केली जाणार आहे. शिंदे गटाकडे आता सर्वांचाच कल वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे कार्यकर्ता मेळावा आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. असे असतानाही बंडखोरीला काही ब्रेक लागताना दिसत नाही. याबाबत पुणे नगरसेवक आणि पदाधिकारी हे शनिवारी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत.