मुंबई | 04 जानेवारी 2024 : संसदेत दोन तरुणांनी घुसून स्मोक जेल कांडी फोडल्या होत्या. या घटनेमुळे देशभरात एकच खळबळ उडाली होती. राज्यसभा आणि लोकसभेतील खासदारांचे निलंबन करण्यात आले. त्या घटनेचा निषेध करताना तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड़ यांची मिमिक्री केली होती. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी त्यांच्या फोनवर हे सर्व रेकॉर्ड केले होते. या प्रकारामुळे देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. तर उपसभापती जगदीप धनखड़ यांनी या घटनेमुळे आपण खूपच व्यथित झाल्याचे सांगितले होते.
तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनखड़ यांच्या त्या मिमिक्रीला कलेचा प्रकार म्हटले होते. असे आपण हजारोवेळा करत राहू आणि तसे करण्याचा त्यांचा मूलभूत अधिकार आहे, असे त्यांनी ठणकावून सांगितले होते. तर, उपसभापती जगदीप धनखड़ यांनी सर्व अपमान सहन करूनही, सेवा मार्गापासून कधीही विचलित होणार नाही. तसेच, इतरांच्या विचारांना स्थान दिले पाहिजे, असे म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिले होते.
दरम्यान, उपसभापती जगदीप धनखड़ यांनी ज्या खासदारांनी त्यांची मिमिक्री केली होती त्या तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांना डीनरचे आमंत्रण दिले आहे. निमित्त होते खासदार कल्याण बॅनर्जी यांच्या वाढदिवसाचे… उपसभापती धनखड़ यांनी कल्याण मुखर्जी यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेछ्या देत त्यांचे अभिनंदन केले. तसेच, कुटुंबियांसह त्यांना जेवायला बोलावले.
खासदार कल्याण मुखर्जी यांनी याबद्दल उपसभापती जगदीप धनखड़ यांचे एक्सवर आभार मानले आहेत. राज्यसभेचे उपसभापती जगदीप धनखड़ यांनी मोठे मन दाखवत शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, राज्यसभेच्या उपसभापती यांनी त्यांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जेवायला बोलावले आहे. बॅनर्जी यांनी X वर पुढे असे लिहिले आहे की, ‘माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या हार्दिक शुभेच्छांबद्दल मी माननीय उपराष्ट्रपतींचे आभार मानतो. त्यांनी माझ्या पत्नीशी वैयक्तिकरित्या टेलिफोनवर बोलून माझ्या संपूर्ण कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद दिल्याने मी भारावून गेलो आहे.
मिमिक्रीच्या त्या घटनेबद्दल अनेक सदस्यांनी कल्याण मुखर्जी यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. विशेष म्हणजे उपराष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी जगदीप धनखड़ हे पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. त्याच काळात त्यांचे आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते यांच्यातील संबंध बिघडले होते. त्याचमुळे कल्याण मुखर्जी यांनी निमित साधून त्यांची मिमिक्री केल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे, जगदीप धनखड़ यांच्या या कृतीची आता देशभरात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे.