मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेतील (shivsena) जवळपास सर्वच आमदारांनी पाठिंबा दिला आहे. आता शिवसेनेकडे केवळ 15 आमदार शिल्लक आहेत. बाकीचे सर्व आमदार हे एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झाले आहेत. सुरुवातीला आपल्याला 35 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला होता. मात्र गेल्या दोन दिवसांत शिवसेनेला सोडून, एकनाथ शिंदे यांना जऊन मिळणाऱ्या आमदारांच्या संख्येमध्ये वाढच होत आहे. विशेष म्हणजे यात शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांचा देखील समावेश आहे. कालच उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले होते. मात्र त्यानंतर देखील आमदारांची बंडखोरी सुरूच आहे. आज पुन्हा शिवसेनेचे तीन आमदार गुवाहाटीला गेले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी जेव्हा शिवसेनेविरोधात बंड केले होते तेव्हा शिवसेनेकडे 22 आमदार शिल्लक होते. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या वाढली असून, आता शिवसेनेकडे केवळ 15 च आमदार आहेत. त्यामध्ये राजन साळवी (राजापूर), सुनील प्रभू (मालाड), प्रकाश फातर्पेकर (चेंबूर), सुनील राऊत ( विक्रोळी), वैभव नाईक ( कुडाळ-मालवण), आदित्य ठाकरे ( वरळी), रमेश कोरगावकर (भांडुप), कैलास पाटील (पाचोरा), नितीन देशमुख ( बाळापूर), अजय चौधरी (शिवडी), राहुल पाटील (परभणी), संतोष बांगर ( हिंगोली), भास्कर जाधव (गुहागर), रवींद्र वायकर ( जोगेश्वरी) आणि संजय पोतनीस ( कलिना) यांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदेंना शिवसेनेच्या तब्बल 41 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. तर सहा अपक्ष आमदार देखील शिवसेनेच्या गटात सहभागी झाले आहेत. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्याकडे एकूण 47 आमदारांचे संख्याबळ आहे. याच आमदारांच्या संख्याबळावर एकनाथ शिंदे यांनी आता उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदारांचे पुरेसे संख्याबळ असल्याने महाविकास आघाडी सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकनाथ शिंदे हे भाजपासोबत जाऊन सत्ता स्थापन करू शकतात असा अंदाज आता वर्तवण्यात येत आहेत. याचा पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि भाजपामध्ये बोलणी देखील सुरू झाली आहेत.