नवी दिल्ली : ओडिशामध्ये भाजप आणि नवीन पटनायक यांच्या बीजेडी पक्षामध्ये जागावाटपावरून मतभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि बीजेडी युती संपुष्टात आली आहे. या दोन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. ओडिशाचे भाजपच्या राज्य युनिट प्रमुख मनमोहन सामल यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप एकट्यानेच लढवणार आहे. ओडिशातील लोकसभेच्या सर्व 21 जागा आणि सर्व 147 विधानसभेच्या जागा पक्ष लढवेल आणि जिंकेल असे त्यांनी सोशल मीडिया X वर म्हटले आहे.
ओडिशामध्ये विधानसभेच्या 147 तर लोकसभेच्या 21 जागांसाठी निवडणुका होत आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचा पक्ष बीजेडी आणि भाजप यांच्यात युती संदर्भात चर्चा सुरु होती. भाजप आणि बीजेडी यांच्यात जागावाटपाबाबत बोलणीही सुरु होती. मात्र, अचानक भाजपचे राज्यप्रमुख मनमोहन सामल यांनी भाजप स्वतंत्र निवडणुका लढविणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे ही युती मोडल्यात जमा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या मध्यवर्ती नेत्यांसोबत युती आणि जागावाटपावर अनेक फेऱ्या चर्चा झाल्या. मात्र, भाजपने लोकसभेच्या 21 जागांपैकी 14 जागांवर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली. यामुळे बीजेडीला अवघ्या 7 जागांवर समाधान मानावे लागणार होते. तर, विधानसभेच्या 147 जागांपैकी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बीजेडीने 100 जागांची केलेली मागणी भाजपने फेटाळली. त्यामुळे जागावाटप निश्चित न झाल्यामुळे युतीची बोलणी फिस्कटली.
त्याचप्रमाणे दोन्ही पक्षांमध्ये युती न होण्यामागे आणखी काही मुद्दे असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली. बीजेडीला भुवनेश्वर आणि पुरी या दोन लोकसभा जागा हव्या होत्या. मात्र, या जागा भाजपलाही हव्या होत्या. त्याचप्रमाणे विधानसभा जागावाटपमध्ये बीजेडीला कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य नव्हती. हे ही युती तुटण्यामागील कारण आहे. ओडिशा राज्यात 13 मे, 20 मे, 25 मे आणि 1 जून या चार टप्प्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत.