योगेश बोरसे, tv9, पुणे: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाळीनंतर आता शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना भवन कुणाचं? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. पक्षाचे नाव आणि चिन्ह याचा वाद तर थेट सुप्रीम कोर्टात गेला आहे. मात्र, शिवसेना भवनाचा वाद मिटवण्यासाठी शिंदे आपलं नविन शिवसेना भवन बांधणार आहे. नविन शिवसेना भवनासाठी शिंदे गटाने पुणे शहराची निवड केली आहे.
पुण्यात शिंदे गटाच्या कार्यालयाची जागा निश्चित करण्यात आली आहे. सारसबागेसमोरील इमारतीत शिंदे गटाचे नवीन कार्यालय सुरु होणार आहे.
या कार्यालयाला देण्यात येणारे नावही निश्चित करण्यात आले आहे. बाळासाहेबांची शिवसेना भवन असं या कार्यलयाचं नाव असणार आहे.
साधारणपणे 5 हजार चौरस फुटावर हे शिंदे गटाचे कार्यालय असणार आहे. कार्यालयामध्ये मिटिंग हॉल, पत्रकार परिषद हॉल, जनता दरबार हॉलचे नियोजन करण्यात आलं आहे.
सध्या या कार्यालयाचे काम युद्ध पातळीवर सुरू असून दिवाळी पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन केलं जाणार असल्याची माहिती शिंदे गटाचे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी दिली. एकनाथ शिंदे दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारणार अशी देखील चर्चा होती.