मुंबई : (Shivsena Rebel MLA) शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली असताना देखील (MVA) महाविकास आघाडीतील मतभेद हे काही लपून राहिले नव्हते. मध्यंतरी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेत्यावरुन मविआ मधील मतभेद आणखीनच ताणले गेले होते. अखेर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदी शिवसेनेच्या आंबादास दानवे यांची वर्णी ही लागलीच, असे असतानाही आम्हाला विश्वासात घेतले असते तर बरे झाले असते असे म्हणणारे (Nana Patole) कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेच आता एकजुटीने लढण्याचा नारा देत आहेत. आज विधानभवनात महाविकास आघाडी बैठक झाली. आगामी काळातील निवडणुकांना कशाप्रकारे सामोरे जायचे यासह सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीबद्दलही या बैठकीत चर्चा झाली आहे. मात्र, 15 दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचे समोर आले असताना देखील आता एकजुटीचा नारा दिला गेल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
ज्या प्रमाणे शिंदे सरकार सत्तेमध्ये आले आहे ते कदाचित नियतीलाही मान्य नसावे असेच प्रसंग राज्यात घडत आहेत. सरकारची स्थापना होताच राज्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा सामना करावा लागला आहे. नैसर्गिक संकट राज्यावर ओढावले होते. एवढेच नाहीतर या सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्यादेखील वाढलेल्या आहेत. अशी सर्व परस्थिती असतानाही सरकारला याचे काही देणेघेणे राहिलेले नाही. राज्यातील जनता त्रस्त आहे. अशातच यांच्याकडून पक्ष हितासाठी दौरे काढले जात आहेत. सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीच राहिलेले नाही असा आरोपही नाना पटोले यांनी सरकारवर केला आहे.
सध्या राज्यातील शेतकरी अनेक अडचणींचा सामना करीत आहेत. राज्य सरकारकडून मदत दिल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्ष स्थानिक पातळीवरची स्थिती ही वेगळी आहे. अनेक क्षेत्रावरील नुकसानीचे पंचनामे देखील झालेले नाहीत. केवळ घोषणा केल्या जातात, अंमलबजावणीबाबत हे शिंदे सरकार सपशेल अपयशी ठरलेले आहे. राज्यातील अन्नदात्यावरच उदरनिर्वाह कसा करावा हा प्रश्न आहे. त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेऊन भरीव मदतीसाठी लढा उभारला जाणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले आहे. यंदाच्या खरीप हंगामातही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विरोधी पक्ष हा कटीबद्ध असल्याचे पटोले यांनी सांगितले आहे.
शिंदे सरकार सत्तेत कसे आले आहे याची कल्पना उभ्या महाराष्ट्राला आहे. पक्षांतर कायद्याचे उल्लंघन यातील शिंदे गटाने केले आहे. सध्या या सरकारमधील अनेक नेते हे वेगळ्याच अविर्भावात असले तरी हे जास्त दिवसांसाठी नाही. कारण हे कायद्याचे उल्लंघण करुन सत्तेत बसले आहे. न्यायदेवतेवर आपला विश्वास असून याबाबतही निकाल लवकरच लागेल असेही पटोले यांनी स्पष्ट केले आहे.