मुंबई : उच्च न्यायालयाच्या (High Court) निकालानंतर शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहचला आहे. तीन महिन्याच्या प्रतिक्षेनंतर पक्षाला आणि नेतृ्त्वाला दिलासा देणारी बाब घडली आहे. कारण शिवतीर्थावर दसरा मेळावा (Dussehra Rally) घेण्याचा शिवसेनेचा मार्ग खुला झाला असून आता खऱ्या अर्थाने तयारी सुरु झाली आहे. उच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी ही सरकारकडे दिली असली तरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवसैनिकांना एक अवाहन केले आहे. दसरा मेळावा ही शिवसेनेची गेल्या 66 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे या तेजस्वी उत्सवाला गालबोट लागू नये असे अवाहन त्यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. शिवाय विजय सत्याचाच म्हणत आगामी काळातही सर्वकाही सुरळीत होईल असा विश्वास त्यांनी दिला आहे.
शिवसेनेच्या परंपरेला अडथळा निर्माण व्हावा यासाठी अनेकजण कामाला लागले होते. त्यामुळे राज्यात अस्थिरतेचे वातावरणही झाले होते. पण अखेर सत्याचा विजय हा होणारच. त्यामुळेच न्यायादेवतेच्या निकालामुळे शिवसेनेची परंपरा अखंडित राहणार आहे.
न्यायालयाने परवानगी दिली असली तरी हा सोहळा शांततेत पार पडवा यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे पक्षप्रमुख म्हणाले आहेत. कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी जेवढी सरकारची आहे तेवढीच शिवसैनिकांची असेही पक्षप्रमुखांनी सांगितले आहे.
अनेक अडचणींवर मात करुन यंदाचा मेळावा पार पडणार आहे. त्यामुळे राज्यभरातून शिवसैनिक हे शिवतीर्थाकडे येतील. त्यामुळे उत्साहाच्या गुलालाची उधळण असू द्या पण त्यामुळे अनुचित प्रकार घडणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार आहे.
न्यायदेवताच्या निर्णयामुळे लोकशाहीचा विजय झाला आहे. आजच्या निर्णयामुळे न्यायदेवतेवरील विश्वास सार्थ ठरला आहे. आता सुप्रीम कोर्टाचा निकालही लोकशाहीचे भवितव्य ठरणारा असणार आहे. त्यावर आताच काही सांगता येणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
निकालानंतर आपल्याला पहिला दसरा मेळावाही आठवत असल्याचे सांगितले. कोरोनाकाळात खंड पडला पण आता कधीही यामध्ये खंड पडणार नसल्याचे सांगत आगामी काळातही ही परंपरा कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आता कोर्टाच्या निर्णयानंतर मेळावा यशस्वीरित्या पार पाडणे ही जबाबदारी राहणार आहे.