असेही एक मतदान केंद्र, जिथे करतात केवळ पाच मतदार मतदान

| Updated on: Nov 26, 2023 | 10:24 PM

मतदारांना मतदानासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये यासाठी हे मतदान केंद्र दुर्गम ग्रामीण भागात बांधले. यासाठी प्रशासनाने चार सदस्यीय मतदान पथक तयार केले होते. हे मतदान केंद्र उभारण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांना सात ते आठ किलोमीटरची मोठी नदी पार करावी लागली.

असेही एक मतदान केंद्र, जिथे करतात केवळ पाच मतदार मतदान
chhattisgarh vidhan sabha election 2023
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

Chhattisgarh Assembly elections 2023 | रायपूर | 26 नोव्हेंबर 2023 : छत्तीसगड राज्यातील अनेक जिल्हे हे आदिवासी बहुल जिल्हे आहेत. डोंगराळ भाग, घनदाट जंगल आणि मध्ये खोल दरी यामुळे हे जिल्हे सर्वाधिक धोकादायक जिल्हे म्हणून ओळखले जातात. याच आदिवासी बहुल भागात नक्षलवादी आपले ठाण मांडून बसले आहेत. छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी दोन टप्प्यात मतदान झाले. छत्तीसगडच्या 90 विधानसभा जागांसाठी 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर अशा दोन टप्यात मतदान झाले. या निवडणुकीत लोकांनी मतदानासाठी उत्साह दाखविला. पण, याच छत्तीसगड राज्यात अशी अनेक मतदान केंद्र आहेत की जिथे दोन डझनही मतदार नाहीत.

छत्तीसगड राज्याचा पहिला विधानसभा मतदारसंघ क्रमांक 1 हा भरतपूर सोनहाट क्षेत्राचा आहे. कोरिया जिल्ह्याचा एका भाग आणि चिरमिरी जिल्ह्याचा मनेंद्रगड हा दुसरा भाग असा मिळून हा मतदार संघ तयार झालाय. याच भरतपूर – सोनहाट विधानसभा मतदारसंघात अशी अनेक मतदान केंद्रे आहेत की जिथे दोन डझनही मतदार नाहीत.

भरतपूर – सोनहाट विधानसभा मतदारसंघातील कांटो मतदान केंद्रात केवळ 12 मतदार आहेत. रेवाला येथे 23 मतदार आहेत. यात 14 पुरुष आणि नऊ महिला मतदार आहेत. कांटो आणि रेवाला ही गावे अशी आहेत की जिथे फक्त ट्रॅक्टरनेच पोहोचता येते. दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी अद्याप रस्त्याची सोय नाही. तर, शेरदंड येथे मतदान केंद्र आहे. याच मतदान केंद्रावर केवळ पाच मतदार मतदान करतात. यामध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी 100 टक्के मतदान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

शेरदंड या गावात सुमारे 15 वर्षांपूर्वी पती पत्नी असे दोनच मतदार होते. या दोन मतदारांसाठी प्रशासनाने येथे पहिल्यांदा मतदान केंद्र उभारले. त्यामुळे हे केंद्र देशात चर्चेत राहिले होते. आता त्यांचे कुटुंब वाढल्यानंतर या मतदारांची संख्या पाच इतकी झाली आहे. जंगलात राहणारे शेरदंडमधील हे एकमेव कुटुंब आहे.

शेरदंड येथे शासकीय इमारत उपलब्ध नाही. त्यामुळे प्रशासन निवडणुकीच्या कामासाठी येथे झोपडी तयार करते. येथे जाण्यासाठी मतदारांना ट्रॅक्टरने नेले जाते. शेरदंडमध्ये मतदान केंद्र बांधल्यापासून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत 100 टक्के मतदान होते. नक्षलग्रस्त आणि दुर्गम डोंगराळ भागात जेथे नक्षली कारवायांचा सर्वाधिक धोका होता तेथे ही मतदान केंद्रे होती. परंतु, या मतदारांनी प्रचंड उत्साह दाखवला आणि मतदानाची नोंद केली.

निवडणूक अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार येथील मतदारांना मतदानासाठी लांबचा प्रवास करावा लागू नये यासाठी प्रशासनाने हे मतदान केंद्र अशा दुर्गम ग्रामीण भागात बांधले. शेरदंडमध्ये त्या पाच जणांना मतदान करण्यासाठी प्रशासनाने चार सदस्यीय मतदान पथक तयार केले होते. हे मतदान केंद्र उभारण्यासाठी मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सात ते आठ किलोमीटर चालत एक मोठी नदी पार करावी लागली अशी माहिती त्यांनी दिली.