मुंबई : बंडामध्ये सहभागी झालेले सर्वच आमदार नाराज असे नाही तर काहीजण हे दबावात आहेत. ते (Shivsena) शिवसेनेशी संपर्क करीत असल्याचे केवळ खा. संजय राऊत यांनीच नव्हे तर खुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील सांगितले होते. मात्र, अशा अफवा पसरुन संभ्रम निर्माण करण्याचे काम केले जात होते. प्रत्यक्षात सर्वच आमदारांमध्ये नाराजी होती. आणि बळजबरीने आले असते तर त्यांना चार्टर्ड विमानाने परत पाठविले असते असे म्हणत (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट (Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनाच डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आमदारांवर बळजबरी हे तर दूरच पण अनेक आमदारांच्या मनातील गोष्ट यामधून घडली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितले आहे.
आतापर्यंत विरोधी पक्षातून सत्तेकडे जाणाऱ्यांची संख्या अधिक असते. पण आपला उद्देश आणि हिंदुत्वाचा मुद्दा यावर 39 आमदरांनी सत्ता आणि मंत्रीपद बाजूला ठेऊन सत्तेतून बाहेर पडणे पसंद केले. शिवाय दिवसेंदिवस बंडखोरांची संख्या ही वाढत होती. त्यांच्यावर ना कोणता दबाव होता ना कोणते आमिष दाखविण्यात आले होते. केवळ जनतेचा विकास आणि बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कायम ठेवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे अशा या घटनेची नोंद इतिहासात होईल. बंडखोर आमदार संपर्कात होते असे म्हणणाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडे बोल सुनावले आहेत. शिवाय तो किती खोटा दावा होता हे देखील पटवून सांगितले आहे. यामधून एकनाथ शिंदे यांनी थेट नेतृत्वालाच आव्हान दिले आहे.
बंडखोर आमदारांवर कोणता दबावच नव्हता शिवाय तशी परस्थिती देखील निर्माण झाली नव्हती. उलट गटामध्ये सहभागी होणारा प्रत्येक आमदार हा आनंदात होता. आमदारांचा सत्तेतून बाहेर पडण्याचे कारण आणि उद्देश हा स्पष्ट असल्याने दिवसाकाठी बंडखोरांची संख्या ही वाढतच गेली. शिवाय कोणी नाराज असते तर त्या आमदाराच्या परतीची सर्व सोय केली असती. एवढेच नाहीतर चार्टर्ड विमानाने त्यांना परत पाठविले असते असेही शिंदे यांनी सांगितले.
दिवसेंदिवस शिंदे गटात बंडखोरांची संख्या वाढत असताना देखील त्या आमदारापैकी 20 जण संपर्कात असल्याचा दावा खा. संजय राऊत, आ. आदित्य ठाकरे एवढेच नाहीतर खुद्द उद्धव ठाकरे यांनी देखील केला होता. पण असे काहीही नव्हते तर या आमदारांमध्ये संभ्रमता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचे शिंदे यांनी सांगितले. अध्यक्ष पदाच्या निवडीनंतर बंडा दरम्यान काय झाले हे सांगताना त्यांनी हा खुलासा केला आहे.