औरंगाबाद : आपल्या विशिष्ट भाषाशैलीमुळे राजकारणात ट्विस्ट आणणारे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar) यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. मध्यावधी होणार असे बोललोच नव्हतो असे म्हणत मध्यावधी निवडणुकांबाबत(Election) शरद पवारांनी खुलासा केला आहे. राज्यात शिवसेना-भाजप(Shivsena-BJP) सरकार अस्तित्वात आले आहे. यानंतर मध्यावधी निवडणुकांच्या चर्चेबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी असं म्हणालोच नव्हतो असे शरद पवारांनी सांगलीतले. औरंगाबाद येथे आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेत मध्यावधी निवडणुका, औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा, राज्यपाल, शिंदे आणि फडणवीस यांची जवळीक अशा विविध विषयांवर भाष्य केले.
राज्यातील राजकीय स्थिती आणि सध्याचे सरकार या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी भाष्य केले. मध्यावधी निवडणुका होतील, असे म्हणालोच नव्हतो, असे शरद पवार म्हणाले. काही दिवसांपासून राज्यात मध्यावधी निवडणूक लागतील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. त्यावर शरद पवारांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
पुढील निवडणुकीसाठी अडीच वर्षांचा कालावधी आहे. कोणतीही निवडणूक असली की, सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. त्या अनुशंगाने आपण पक्षातील नेत्यांना निवडणुकीसाठी तयारी लागण्याच्या सूचना केल्या होत्या असा खुलासा शरद पवारांनी केला आहे.
पुढील काळात येणाऱ्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढाव्यात अशी आपली इच्छा असल्याचे शरद पवार यांनी सांगीतले. महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवायची असल्यास एकत्र बसून चर्चा करुन निर्णय घ्यावे लागतील. विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाऊ अशी इच्छा होती, पण चर्चा झाली नव्हती. आमच्यात काही झाले नव्हते. जे गेलेत ते दुसरीकडचे गेले आहेत, त्यामुळे आम्ही काय करायचा प्रश्न नाही.
या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही आपल्या खास शैलीत टोमणा हाणला. देशात आणि राज्यात ज्या गोष्टी घडतात त्यामुळे आमच्याही ज्ञानात भर पडत आहे. मंत्रिमंडळाने विधानसभा अध्यक्षपद भरावं यासाठी प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवला. राज्यपालांना कष्टदायी काम असल्याने वर्षभरात त्यांनी मंजूर केला नाही. नवे सरकार येताच 48 तासात राज्यपालांनी तत्परता दाखवली . महाराष्ट्राची परंपरा समृद्ध करणारे राज्यपाल राज्याने पाहिले आहेत. सध्याचे राज्यपाल चमत्कारिक आहेत, त्यांच्यावर बोलण्यास वाव आहे, पण मी बोलणार नाही,असे म्हणत त्यांनी राज्यपालांना चिमटा काढला.
महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमात औऱंगाबादच्या नामांतराचा मुद्दा नव्हता. नामांतरापेक्षा शहरांच्या मुलभूत प्रश्नात लक्ष द्यायला हवे होते असे पवार यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडीच्या शेवटच्या मंत्रीमंडळ बैठकीत औरंगाबादच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
लपूनछपून भेटायचं कायतर प्रेमप्रकरण चालू होतं पण आम्हाला भाजपची कुठलीही ऑफर नव्हती असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या रात्रीच्या भेटींच्या चर्चेबाबत भाष्य केले. सत्ता आपल्या हातातून गेली म्हणून काही लोकं अस्वस्थ होते. त्यांची अस्वस्था काही प्रमाणात दूर झाली असेल असे मी समजतो. .
बंडखोर आमदारांना सांगयाला काही निश्चित कारण नाही, म्हणून कोणी हिंदूत्वाचं कारण सांगतं, तर कुणी निधी दिला नाही म्हणून सांगतं. जो निर्णय घेतला त्या निर्णयाला काही आधार नाही. सरकार बनल्यानंतर अनेक लोक सांगायचे राष्ट्रवादीचे मंत्री जास्त काम करतात जास्त प्रश्न सोडवतात असा अनुभव मी आघाडीच्या नेत्यांकडून ऐकला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे आता काहीह सक्षम कारण नाही. हे कार्य करण्यामागे काय प्रभावशाली होतं हे मला माहिती नाही असेही शरद पवार म्हणाले.