मुंबई : लोकसभा निवणूक 2019 आता शेवटच्या टप्प्यात आली आहेत. चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडणार आहे. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांनंतर पंतप्रधान कोण होणार, याबाबत मोठं भाष्य केलं आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीएला यावेळी लोकसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळणं अत्यंत कठीण आहे. जर एनडीएला बहुमत मिळालं नाही, तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख तसेच उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती हे तीन जण मला पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार वाटतात”, असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. विशेष म्हणजे शरद पवारांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना यातून वगळलं आहे.
टाईम्स वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी त्यांचं मत स्पष्टपणे मांडलं. पंतप्रधान पदासाठी तुमची पसंती कुठल्या तीन नावांना असेल? या प्रश्नावर पवारांनी, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि मायावती या तीन नावांना पसंती दिली. “पंतप्रधान मोदी हे पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्यात केलेली कामगिरी पाहून 2014 मध्ये लोकांनी एनडीए सरकारला बहुमताने निवडून दिलं. तसेच, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी आणि मायावती या तिन्ही नेत्यांना एक मुख्यमंत्री म्हणून देशाचा कारभार सांभाळायचा चांगला अनूभव आहे. त्यामुळे हे तिघं सध्या पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय आहेत, असं मला वाटतं”, असेही शरद पवार म्हणाले. शरद पवारांच्या या भाकितामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
“काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्वत:ला पंतप्रधानपदाच्या स्पर्धेतून बाहेर ठेवलं आहे. ते पंतप्रधानपदासाठी योग्य नाही असं मी म्हणत नाही. पण, मायावती, ममता आणि नायडू हे देखील पंतप्रधानपदासाठी योग्य पर्याय ठरु शकतात, असं माझं मत आहे”, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
तसेच, ते स्वत: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचंही पवारांनी सांगितलं. विशेष म्हणजे, पवारांचं हे वक्तव्य त्यावेळी आलं आहे, जेव्हा मायावती, ममता आणि नायडू हे तिनही नेते आपआपल्या मतदार क्षेत्रात जास्तीत जास्त मतं मिळवूण निवडणुका जिंकण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. त्यामुळे पवारांचं हे भाकित आहे की, कुठली राजकीय खेळी हे तर निवडणुकांचे निकाल आल्यावरच कळेल. पण, पवारांच्या या वक्तव्याने विरोधी पक्षाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पाहा व्हिडीओ :