बीड : दसरा मेळावा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शिवसेना पदाधिकारी (Shiv Sena) जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन पक्षाची भूमिका आणि सरकारचे अपयश हे जनतेच्या निदर्शनात आणूण देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्याचअनुषंगाने बीड जिल्हा (Beed District) दौऱ्यावर असलेल्या निलम गोऱ्हे यांनी सरकारवर तर टीका केली आहेच पण भाजप पक्षाच्या आश्रयाला राहून काहींना रोजगारही मिळाला असल्याचे म्हणत त्यांनी खा. नवनीत राणा आणि किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. विकासाचे राजकारण तर सोडाच पण पायात खोडा घालण्यासाठीच यांना महत्व दिले जात असल्याचे गोऱ्हे (Nilam Gore) यांनी सांगितले. उट-सूठ शिवसेनेवर टीका करणे हा त्यांच्यासाठी रोजगाराचे साधनच असल्याचे त्या म्हणाल्या आहेत.
सत्ता परिवर्तन कशा पद्धतीने झाली हे उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. आता सत्तांतर होऊन देखील यांचे राजकारण हे सुरुच आहे. विकास कामात राजकारण न करता ते काम अविरतपणे सुरु ठेवणे गरजेचे आहे. मात्र, या सरकारकडून प्रत्येक कामाला स्थगिती दिली जात आहे.
महाविकास आघाडी काळात सरकारने घेतलेले निर्णय हे जनतेच्या हिताचे आणि विकासाचे आहेत. केवळ राजकीय स्वार्थासाठी ‘मविआ’ च्या निर्णयाला स्थगिती दिली जात असल्याचा आरोप शिवसेनेच्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे.
राज्यातून उद्योग-धंदे इतरत्र जात आहेत यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असताना यांचे वेगळेच उद्योग सुरु आहेत. त्याचा परिणाम विकास कामावर परिणाम राज्यावर होत आहे. सर्वकाही इतरांचे खच्चीकरण आणि आपले पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी केले जात असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातील मतभेदावर उत्तर देण्यास निलम गोऱ्हे यांनी टाळाटाळ केली. मात्र, पंकजा मुंडे ह्या एक लोकनेत्या आहेत. त्यांचे काम देखील चांगले आहे. पण त्या काय बोलल्या हे माहित नाही. पण त्यांची प्रगती होत रहावी अशा शुभेच्छा गोरे यांनी दिल्या आहेत.
मिलिंद नार्वेकर हे कुठेच जाणार नाहीत. राजकारणामध्ये जर आणि तर याला काहीच अर्थ नसतो. समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाज माध्यमामध्ये काहीही सुरु असले तरी गुलाबराव पाटील आणि मिलिंद नार्वेकर हे शिवसेनेतच राहतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.