ठाणे : “आतापर्यंत युतीमध्ये लढल्यामुळे पालिका निवडणुकांमध्ये नेमही शिवसेनेचा महापौर झाला. यापुढे शिवसेना आणि भाजप वेगळी निवडणूक लढणार आहेत. यावेळी राज्यातील सर्व महापालिकांवर भाजपचाच महापौर निवडून येणार,” असा विश्वास भाजप नेते आशिष शेलार यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात कोपरी प्रभागात देवीचे दर्शन घेण्यासाठी आले असताना ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. भाजपला सोडून शिवसेनेत प्रवेश केलेले नाशिकचे वसंत गीते आणि सुनिल बागुल यांच्या शिवसेना प्रवेशावरही आशिष शेलार यांनी टीका केली.
“महाविकास आघाडीमध्ये पहिल्यापासूनच बिघाड आहे. ही बिघडलेली आघाडी आहे. यांनी राज्याला बिघडवू नये एवढीच आमची इच्छा आहे. आम्ही आतापर्यंत युतीमध्ये निवडणुका लढवल्या. त्यामुळे प्रत्येक महापालिकेत शिवसेनेचा महापौर असायचा. यांनतर आम्ही स्वतंत्रपरणे लढणार आहोत. त्यामुळे प्रत्येक महापालिकेवर भाजपचाच महापौर होणार,” असे आशिष शेलार म्हणाले. तसेच नाशिकचे वसंत गीते आणि सुनिल बागुल यांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर बोलताना, फोडाफोडीचे राजकारण किती केलं तरी दुर्बलाला बळाचं बळ कधीच मिळू शकत नसल्याचं ते म्हणाले. आम्ही स्वबळावर लढणारे आहोत. ते तिघेही दुर्बल आहेत, असे म्हणत शेलार यांनी महाविकास आघाडीवर फोडाफोडीचे राजकारण करण्याचा आरोप केला.
भंडारा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालायात आग लागून 10 बालकांचा मृत्यू झाल्यांनतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेत जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर करावाई करावी अशी मागणी शेलार यांनी केलीये. “भंडारा येथील घटना अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहे. राज्य सरकारच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये दिरंगाई आणि बेपरवाई होत,” असे म्हणत या दुर्दैवी घटनेची चौकशी 7 दिवसांत करण्याची मागणी शेलार यांनी केली. तसेच 7 दिवसांत जे दोषी आहेत त्यांना कडक शासन व्हावे असेसुद्धा शेलार म्हणाले. या दुर्घटनेत ज्या कुटुंबांची बालकं मृत्युमुखी पडली आहेत, त्यांच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत करण्याचीही त्यांनी मागणी केली आहे.
संबंधित बातम्या :