ठाणे : एकीकडे एक सर्वसामान्य निष्ठावंत कार्यकर्ता आहे, तर विरोधात गद्दार आहे. मागच्या निवडणुकीत जनतेने जसा गद्दाराला धडा शिकवला, तसाच धडा या वर्षीही सुज्ञ ठाणेकर शिकवतील. मी दलबदलू नाही म्हणून लोकांनी मला गल्ली ते दिल्लीपर्यंत नेलं. तेव्हा ठाणे लोकसभा मतदारसंघात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई आहे, अशा प्रकारे शिवसेना खासदार राजन विचारे राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना टोला लगावला. येत्या निवडणुकीत ठाण्यात चांगलीच लढत बघायला मिळणार आहे. शिवाय मागच्या निवडणुकीपेक्षा अधिक लीड यावर्षी घेणार असल्याचा आत्मविश्वास शिवसेना-भाजप युतीचे विद्यमान खासदार आणि उमेदवार राजन विचारे यांनी व्यक्त केला.
ठाणे लोकसभा मतदारसंघातून पक्षाने आणि लोकांनी मला दुसऱ्यांदा जबाबदारी दिली आहे. गेल्यावर्षी 2 लाख 80 हजारांचा लीड होता. यंदा लीड वाढणार आहे. कारण ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भायंदर परिसरात विरोधकांचे साधे नगरसेवकही नाहीत. नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेचे तब्बल 48 च्या आसपास नगरसेवक आहेत. शिवसेना आणि भाजप युती ही अभेद्य आहे. सार्वजन एकजीवाने काम करतील. चार वेळा नगरसेवक, एकदा महापौर, आमदार त्यानंतर खासदार आणि पुन्हा खासदाराची जबाबदारी हे ठाणेकरांनी माझ्या निष्ठेची पोचपावती दिली आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत लोकांनी मला नेलं. ठाणेकर सुज्ञ आहेत. ते निष्ठावंताला विजयी करतील आणि गद्दारांना धडा शिकवतील, असा टोला राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांना विद्यमान खासदार राजन विचारे यांनी लगावला.
ठाण्यातील विधानसभा मतदारसंघांचं समीकरण
ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. तर शिवसेना दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आहे. त्यामुळे या मतदारसंघात युतीचं प्राबल्य आहे.
बेलापुर – मंदाताई म्हात्रे, भाजप
ऐरोली – संदीप गणेश नाईक, राष्ट्रवादी
ठाणे – संजय केळकर, भाजप
ओवला माजीवडा – प्रताप सरनाईक, शिवसेना
कोपरी पांचपाखाडी – एकनाथ शिंदे, शिवसेना
मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता, भाजप