विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 20 दिवस उलटल्यानंतरही महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळत नसल्याचे चित्र होते. अखेर महायुतीच्या नेत्यांची दिल्लीवारी, त्यानंतर बैठकांचे सत्र झाल्यानंतर आता मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरमध्ये होणार असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी म्हणजे उद्या 15 डिसेंबर रोजी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. नव्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून भाजप 2029 च्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारी करत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खास शिलेदाराला यावेळी मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजपकडून 2029 ची तयारी सुरू
महायुतीत भाजपचे आमदार सर्वाधिक असल्याने त्यांच्या वाट्याला अधिक खाती येणार आहेत. भाजपने मंत्रिपदासाठी आपला फॉर्म्युला ठरवला आहे. अनेक ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर पक्ष-संघटनेची जबाबदारी टाकण्यात येऊ शकते. त्यामुळे यावेळी मंत्रिमंडळात काही तरुण चेहरे बघायला मिळू शकतात. याततच आता एक मोठी बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे बंजारा समाजाची पार्श्वभूमी असणारे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना देखील भाजप पर्याय उभा करणार आहे. काही मतदारसंघात विशेषत: मराठवाडा, विदर्भात बंजारा समाजाची चांगली ताकद आहे. ही ताकद आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपने शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय राठोड यांना पर्याय म्हणून डॉ. तुषार राठोड यांना ताकद देण्याचा विचार सुरू केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे, त्यामुळे यावेळी संजय राठोड यांना मंत्रिपदापासून दूर राहवे लागण्याची शक्यता आहे.
डॉ. तुषार राठोड हे मुखेडचे आमदार आहेत. तुषार राठोड यांच्या स्वच्छ प्रतिमेचा फायदा घेत बंजारा समाजावर त्यांची पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपकडून होणार असल्याची चर्चा आहे. डॉ. तुषार राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो. त्यातून त्यांना अधिक बळ देता येईल, असा विचार भाजप नेतृत्वात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. जर तुषार राठोड यांना मंत्रिपद मिळालं तर संजय राठोड यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी आहे.