सांगली : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Assembly Election Result) सध्या राज्यभरात सांगलीची चर्चा होत आहे. याला कारणही तसंच आहे. यावेळी झालेल्या निवडणुकीत सांगलीचे तीन जावई (Son in Law of Sangli become MLA) विधानसभेत पोहचले आहेत. यात राष्ट्रवादीचे नेत धनंजय मुंडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचा समावेश आहे. या तिघांमधील सामाईक दुवा म्हणजे हे तिनही दिग्गज नेते सांगली जिल्ह्याचे जावई (Son in Law of Sangli win the Assembly Election) आहेत. त्यामुळे सांगलीत हा चर्चेचा विषय झाला असून या तिघांचंही कौतुक केलं जात आहे.
धनंजय मुंडे राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. त्यांनी परळी मतदारसंघातून माजी महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला. धनंजय मुंडे हे सांगलीचे जावई आहेत. सांगली जिल्ह्यातील बेडग ही त्यांची सासरवाडी. त्यामुळे परळीतील त्यांच्या समर्थकांसह त्यांच्या सासरवाडीतील लोकांनाही त्यांच्या विजयाचा आनंद झाला. महादेव ओमासे असं धनंजय मुंडे यांच्या सासऱ्यांचं नाव आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे देखील सांगलीचे जावई आहेत. विशेष म्हणजे त्यांचीही सासरवाडी सांगली जिल्ह्यातील बेडग हीच आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि त्यांच्यात हा मोठा सामाईक दुवा आहे. बापूसाहेब घोरपडे (सरकार) असं पृथ्वीराज चव्हाण यांच्या सासऱ्यांचं नाव आहे. घोरपडे यांचा बेडगमध्ये मोठा वाडा देखील आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिणमधून विजय मिळवल्यानंतर बेडगमध्ये आनंदाचे वातावरण आहे. एकट्या बेडगमधील दोन जावई दोन महत्त्वाच्या पक्षांचे मोठे नेते असल्यानं देखील बेडगकरांची छाती अभिमानाने फुलली आहे.
विधानसभेत पोहचलेला सांगलीचा तिसरा जावई म्हणजे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात हे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील तांबवे गावचे जावई आहेत. शहाजीदादा पाटील असं बाळासाहेब थोरात यांच्या सासऱ्यांचं नाव. बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत शिवसेनेच्या उमेदवाराला पराभूत केलं. त्यामुळे तांबवे गावातही आनंदाचं वातावरण आहे. बाळासाहेब थोरात आमच्या गावचे जावई आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याची भावना तांबवे गावचे गावकरी व्यक्त करतात.
अशा पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सांगली जिल्ह्यातील 3 जावयांची मोठी चर्चा होत आहे.