नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील 51 जागांवर मतदान पार पडलं. या सात राज्यात एकूण 62.56 टक्के मतदान झालंय. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 74.60 टक्के, तर उत्तर प्रदेशात 57.33 टक्के आणि बिहारमध्ये 56.79 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या टप्प्यात पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचारही झाला. पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आले, तर काही ठिकाणी जाळपोळही झाली.
पाचव्या टप्प्याचं मतदान सुरु असताना काश्मीर आणि पश्चिम बंगालमधील मतदार संघात बॉम्ब फेकण्यात आले. नागरिकांमध्ये भीती परसरवण्यासाठी समज कंटकांनी बॉम्ब फेक केली. पश्चिम बंगालमध्ये तर भाजप आणि टीएमसीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्त्यांमध्येही तुफान राडा झाला. जम्मू काश्मीरमध्ये मतदानात लोकांनी सहभाग घेऊ नये यासाठी दहशवाद्यांनी आणि फुटीरतावाद्यांनी पुलवामातील गर्ल शाळेतील एका बूथजवळ बॉम्ब फेक केली. बॉम्ब फेक करून हल्लेखोर पसार झाले.
पुलवामामधील एका बूथवर बॉम्ब फेक केल्यानंतर शोपियांमधीलही एका बूथवर पेट्रोल बॉम्ब फेकण्यात आला. पेट्रोल बॉम्ब फेकून हल्लेखोर पसार झाले. लोकांनी मतदान करू नये यासाठीच बॉम्ब फेक करण्यात आल्याचं बोललं जातंय. त्यामुळे मतदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. पण हल्ल्याला न घाबरता मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं. सकाळी मतदानासाठी लोकांच्या विविध बूथवर रांगा पाहायला मिळाल्या.
पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या जिल्हाध्यक्षासह कार्यकर्त्यांनाही मारहाण
काश्मीरमधील मतदारसंघात बॉम्ब फेकण्यात आल्यानंतर पश्चिम बंगालमधील बोगाव मतदारसंघातील 96,118 आणि 119 बूथ परिसरात क्रूडबॉम्ब फेकण्यात आले. इथे भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येक टप्प्यातील मतदानामध्ये संघर्ष पाहायला मिळालाय. या टप्प्यातही हाच प्रकार घडला. मतदारांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी बॉम्ब फेक करण्यात आली. मात्र मतदारांनी समाजकंटकांच्या दहशतीला भीक न घालता मतदान करणं सुरुच ठेवलं.
पश्चिम बंगालमधील बराखपूर मतदारसंघातील अनेक बूथवर हिंसा झाली. टीएमसी आणि भाजपचे कार्यकर्ते बूथवर भिडल्याचं पाहायला मिळालं. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना तुफान मारहाण केली. यात अनेक कार्यकर्ते जखमी झाल्याचं पाहायला मिळालंय. अनेक भागात दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला. त्यामुळे मतदारांमध्ये भीती पसरली होती. भीतीच्या वातावरणातच इथे मतदान पार पडलं. तर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाअध्यक्ष प्रणब शाह यांना मारहाण केली. मारहाणीत ते जखमी झालेत. त्यांनी निवडणूक आयोगाकडे टीएमसीची तक्रारही दिली आहे.
टीएमसीने मतदारांना रोखल्याचा आरोप
पश्चिम बंगालमधील अनेक मतदारसंघात टीएमसीने मतदान रोखलं. तसेच अनेक भागात टीएमसी मतदरांना धमकावत असल्याचा आरोप भाजपने केलाय. ममता बॅनर्जी हारत असल्याने त्यानी गुंडागर्दी सुरु केल्याचा आरोप भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. एवढंच नव्हे, तर टीएमसी बूथ कॅप्चरिंग करत असल्याचा आरोप भाजपने केला. त्यामुळे बराखपूरसह इतर मतदारसंघांमध्ये पुन्हा सुरक्षेसह मतदान घेण्याची मागणी भाजपने निवडणूक आयोगाकडे केली.
लोकसभेच्या पाचव्या टप्प्यांतील 51 जागांसाठी एकूण 674 उमदेवार रिंगणात होते. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड आणि जम्मू-काश्मीर या राज्यात सकाळपासूनच मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. मध्यप्रदेशातील बैतूलमध्ये सर्वात कमी 37.37 टक्के मतदान झालं, तर होशंगाबादमध्ये सर्वाधिक 68.38 टक्के मतदान झालं.