मुंबई : गेल्या महिनाभरपासून दसरा मेळाव्यावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलं होतं. शिवसेना (Shiv sena) आणि शिंदे गटाच्या नेत्यांचे एकोमेंकाविरोधात आरोप- प्रत्यारोप सुरू होते. शिंदे गटाकडून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या कोंडीचा प्रयत्न झाला. तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने देखील शिंदे गटांच्या नेत्यांवर जोरदार आरोप करण्यात आले. त्यामुळे दसरा मेळाव्याची उत्सुकता शिंगेला पोहोचली होती. अखेर तो दिवस आला आहे. आज बीकेसीवर (BKC) शिंदे गटाचा तर शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांत घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्याचं लक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे लागलं आहे.
शिंदे गट आणि शिवसेनेच्या नेत्यांनी दसरा मेळावा प्रतिष्ठेचा बनवला आहे. दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे आपला दसरा मेळावा अधिक चांगला कसा होईल, जास्तीत जास्त गर्दी आपल्या दसरा मेळाव्याला कशी जमा होईल यासाठी दोन्ही गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार आहे. तर शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. दोन्ही गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांनी बीकेसी मैदानात हजेरी लावत तयारीचा आढावा घेतला.
राज्यातील तिसरा दसरा मेळावा आज भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचा होणार आहे. राज्यात सुरू असलेल्या सध्याच्या घडामोडीवर पंकजा मुंडे काय बोलणारं हे पहाण महत्त्वाचं ठरणार आहे.