नवी दिल्ली : गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातल्या अनेक नेत्यांची ईडी चौकशी (ED Enquiry) सुरू आहे. या चौकशीनंतर अनेक बडे नेते जेलमध्येही गेले आहेत, त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचाही समावेश आहे. फक्त राज्यातलेच नाही तर केंद्रातले काही बडे नेतेही ईडीच्या रडारावर आहेत. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचाही समावेश आहे, काही दिवसांपूर्वीच ईडेने सलग दहा-दहा तास अशी चार-पाच दिवस राहुल गांधी यांची चौकशी केली आहे, त्यानंतर सोनिया गांधी यांची तीन तास चौकशी ईडी कडून झाली आहे. मात्र त्यावरही प्रकरण थांबलं नाही सोनिया गांधी यांना आज पुन्हा चौकशीला हजर राहण्यासाठी ईडीने समन्स बजावला आहे.
नॅशनल हेरॉल्ड गैरव्यवहार प्रकरणात काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना चौकशीसाठी ईडीने समन्स बजावला होता. मात्र सोनिया गांधी या कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्या चौकशीला हजर राहू शकल्या नव्हत्या. तर राहुल गांधी हे ईडी समोर चौकशीला हजर राहिले होते. ईडीने राहुल गांधी यांना या प्रकरणाबाबत अनेक सवाल केले आहेत. मात्र त्यांची समाधानकारक उत्तर मिळालं नसल्याची ही माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली होती. तसेच सोनिया गांधी यांचीही तीन तासांसाठी ईडी चौकशी पार पडली होती. मात्र त्या नंतर आज पुन्हा ईडी कडून सोनिया गांधी यांना सवाल केले जाणार आहेत. त्यामुळे आजचाही ईडीचा पेपर सोनिया गांधी यांच्यासाठी सोपान नसणार आहे.
सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या ईडी चौकशीवरून देशभरातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे चित्र ही दिसून आलं. देशभरात अनेक ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. विरोधी पक्षातील नेत्यांचा आवाज दाबण्यासाठी भाजपकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमीरा त्यांच्या मागे लावला जात असल्याचा आरोप वारंवार विरोधकांकडून होत आहे, तसेच राज्यातील नेत्यांच्या चौकशीवरून अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत. एवढंच नाही तर सरकार पाडण्यासाठी भाजपने ईडीचा वापर केला असल्याचाही आरोप झाला आहे. त्यातच काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वावरतीच ईडीची टांगती तलवार असल्याने काँग्रेस अजून आक्रमक मोडमध्ये दिसण्याची शक्यता आहे.