मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे यांचं आज लग्न आहे. लोअर परळ येथील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये हा लग्न सोहळा पार पडणार आहे. या लग्न सोहळ्याला चित्रपट, राजकारण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. काल राज ठाकरेंच्या निवासस्थानी कृष्णकुंज येथे राहत्या घरी हळदीचा कार्यक्रम दुपारी पार पडला. यावेळी ठाकरे कुटुंबीय जवळचे नातेवाईक उपस्थित होते. स्वतः राज ठाकरेही हळदीमध्ये उपस्थित होते. अमितला हळद लागल्यानंतर राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे उष्टी हळद घेऊन आपली होणारी सून मितालीच्या घरी गेल्या होत्या.
LIVE UPDATE :
विशेष म्हणजे या लग्न सोहळ्याला ठाकरे कुटुंबीय एकत्र दिसणार आहेत. कारण, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या शिवसेना-मनसेचं राजकीय नातं वेगळं सांगण्याची गरज नाही. पण उद्धव ठाकरे आणि त्यांचे बंधू जयदेव ठाकरे हे सहकुटुंब सकाळपासूनच हजर असतील.
कोण आहे मिताली बोरुडे?
मिताली बोरुडे फॅशन डिझायनर आहे. तिने फॅड इंटरनॅशनलमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. मिताली प्रसिद्ध बेरिएट्रिक सर्जन डॉक्टर संजय बोरुडे यांची मुलगी आहे. तसेच राज ठाकरे यांची कन्या उर्वशी ठाकरे आणि मिताली बोरुडे या चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघींनी मिळून ‘द रॉक’ हा कपड्यांचा ब्रँड त्यांनी लाँच केला आहे.
अमित आणि मितालीची लव्ह स्टोरी
अमित आणि मितालीची दहा वर्ष जुनी मैत्री आहे. कॉलेजमध्ये असतानाच अमित आणि मिताली एकमेकांच्या प्रेमात पडले. अमित ठाकरे पोद्दार महाविद्यालयात कॉमर्स शाखेत शिकत होते. तर मिताली रुईया महाविद्यालयात कला शाखेत शिकत होती. कॉलेजमध्ये असताना या दोघांची ओळख झाली आणि काही वर्षांनी या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. अमतिने मितालीला प्रपोज केला आणि मितालीनेही त्याला होकार दिला. मिताली आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी असल्यामुळे कृष्णकुंजवर मितालीचे सारखं येणं जाणं सुरु होतं. मात्र काही दिवसानंतर या दोघांनी आपल्या नात्याबद्दल घरात सांगितले आणि दोघांच्या घरच्यांनीही याला होकार दिला.
अमितच्या लग्नासाठी मान्यवरांची उपस्थिती
रविवारी दुपारी लग्नाला अगदी कमी पाहुण्यांना बोलवून विवाह सोहळा पार पडणार आहे. यात राजकीय मंडळी, उद्योगपती, पक्षाचे काही पदाधिकारी उपस्थित असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, अशोक चव्हाण, सुधीर मुनगंटीवार, नितीन गडकरी, आशिष शेलार, प्रसाद लाड यांची उपस्थिती असेल. शिवाय अंबानी परिवार आणि रतन टाटा हे देखील उपस्थित असतील.
संध्याकाळी रिसेप्शनला मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकार, बॉलिवुड कलाकार, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, जावेद अख्तर, सोहेल खान, लता मंगेशकर, आशा भोसले, महेश मांजरेकर यांच्यासह इतर पाहुणे उपस्थित असतील. जवळपास 400 पेक्षा जास्त व्हीव्हीआयपी गेस्ट या लग्नाला येण्याची शक्यता आहे.