मुंबई : महाराष्ट्रातील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात सायंकाळी सहा वाजेपर्यंत अंदाजे 57 टक्के मतदान झालंय. 17 जागांसाठी हे मतदान झालं. राज्यामध्ये चार टप्प्यात एकूण सरासरी 60.68 टक्के इतके मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. राज्यात एकूण 8 कोटी 85 लाख 64 हजार 98 इतक्या मतदारांपैकी 5 कोटी 37 लाख 41 हजार 204 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात चारही टप्प्यात वाढते तापमान असतानाही मतदारांचा उत्साह दिसून आल्याचं मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनी कुमार यांनी सांगितलं.
2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत विचार केल्यास मतदानाचं प्रमाण सारखंच आहे. पहिल्या टप्प्यात 7 मतदारसंघासाठी 63.46 टक्के, दुसऱ्या टप्प्यातील 10 मतदारसंघांसाठी 62.88 टक्के, तिसऱ्या टप्प्यातील 14 मतदारसंघांसाठी 62.36 टक्के तर आज झालेल्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 17 मतदारसंघांमध्ये अंदाजे 57 टक्के मतदान झालं.
चौथ्या टप्प्यातील अंदाजित आकडेवारी
नंदुरबार – 67.64 टक्के
धुळे – 57.29 टक्के
दिंडोरी – 64.24 टक्के
नाशिक – 55.41 टक्के
पालघर – 64.09 टक्के
भिवंडी – 53.68 टक्के
कल्याण – 44.27 टक्के
ठाणे – 49.95 टक्के
मुंबई उत्तर – 59.32 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 54.71 टक्के
मुंबई उत्तर पूर्व -56.31 टक्के
मुंबई उत्तर मध्य – 52.84 टक्के
मुंबई दक्षिण मध्य – 55.35 टक्के
मुंबई दक्षिण – 52.15 टक्के
मावळ – 59.12 टक्के
शिरुर -59.55 टक्के
शिर्डी – 66.42 टक्के
सर्वात कमी मतदान कल्याणमध्ये
महाराष्ट्रात चारही टप्प्यात झालेल्या मतदानाची वैशिष्ट्ये सांगताना श्री. कुमार म्हणाले की, कडक उन्हाळ्याचे दिवस असूनही मतदानाच्या सर्वच टप्प्यांमध्ये मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. विशेषत: शहरी भागांमध्ये मतदारांनी तसेच सेलेब्रिटीज यांनी अतिशय उत्साहामध्ये भाग घेऊन मतदान केले. शहरी भागांमध्ये, सुट्टयांचे दिवस असूनही मतदानाचे प्रमाण चांगले राहिले. महाराष्ट्रामध्ये गडचिरोली-चिमूर मतदारसंघात सर्वात जास्त म्हणजे 71.98 टक्के इतके मतदान झाले तर कल्याण मतदारसंघात सर्वात कमी 44.27 टक्के मतदान झाले, असल्याचे त्यांनी सांगितले.
चारही टप्प्यात शांततेत निवडणूक
संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याकरिता सुमारे 7 लाख 49 हजार 374 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुमारे 1 लाख 4 हजार पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. एकूण सुमारे साडे आठ लाख कर्मचारी या निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आले होते. सर्व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाने शांततेत निवडणूक पार पडली.
कोट्यवधी रुपये जप्त
आतापर्यंत आयकर विभाग, अबकारी विभाग, पोलीस यांनी एकूण रुपये 53 कोटी आठ लाख रोख रक्कम, 70 कोटी 12 लाख किमतीचे सोने, 34 कोटी 15 लाख रकमेचे मद्य आणि मादक पदार्थ असे एकूण 157 कोटी 54 लाख रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच यासंदर्भात 17 हजार 588 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.