पुणे : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराचा आरोप आणि धनंजय मुंडे यांनी आपल्या विवाहबाह्य संबंधाची दिलेली कबुली, यावरुन आता राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. त्यानंतर विविध राजकीय घडामोडींनी गेले दोन ते तीन दिवस गाजले. विरोधी पक्षाकडून राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना आता सामाजिक क्षेत्रातूनही मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून तातडीने हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे. (Trupli Desai Comment on Dhananjay Munde Rape Case)
धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे माहिती देवून सहमतीने शरीरसंबंध ठेवून त्यातून त्यांना दोन मुले असल्याचे कबुली दिल्यामुळे “एक तरफ घरवाली आणि एक तरफ बाहरवाली” असा संदेश जनतेमध्ये जात आहे जो पुढील दृष्टीने चुकीचा आहे, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
रेणू शर्मांनी दिलेली तक्रार गंभीर स्वरुपाची असून तातडीने गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच रेणू शर्मांविरोधात जर कोणी तक्रारी केल्या असतील तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. राष्ट्रवादी पक्षाने तातडीने धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करावी तसेच मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातून मुंडे यांची हकालपट्टी करावी, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.
धनंजय मुंडे यांच्यावरती बोलताना भाजपच्या नेत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक होत धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला. तर त्यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा त्यांनी दिला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांच्या प्रकरणी सावध प्रतिक्रिया दिली. “धनंजय मुंडे यांनी कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी व्हायला हवी. चौकशी झाल्यावरच आम्ही आमची भूमिका स्पष्ट करु”, असं म्हणत फडणवीसांनी आश्चर्यकारक भूमिका घेतली.
‘प्यार किया तो डरना क्या’, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शिवसेना धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय. “धनंजय मुंडे यांनी त्यांचे संबंध लपवून ठेवलेले नाहीत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी सर्व खुलासा केला आहे. त्यांनी त्यांची बाजू महाराष्ट्रासमोर मांडली आहे. तसंच दोघांच्या संमतीने असलेल्या प्रेमाची कबुली दिली आहे. तर मग प्यार किया तो डरना क्या?”, असं म्हणत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी गोपीनाथ मुंडे यांना वापरलेल्या वाक्याची आठवण करुन दिली.
(Trupli Desai Comment on Dhananjay Munde Rape Case)
संबंधित बातम्या
…तर दहा वर्षापूर्वीच माझाही धनंजय मुंडे झाला असता, मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप
मनसेच्या मनीष धुरींनाही रेणू शर्माचे कॉल, कृष्णा हेगडेंनी वात पेटवली
संमतीने ठेवलेले संबंध बलात्कार नसतो, मनसेच्या रुपाली पाटील यांचं रोखठोक वक्तव्य