जितेंद्र आव्हाड यांना भोंदूबाबा म्हणावं का? मांत्रिकाच्या मुद्द्यावर शेलार आणि आव्हाड यांच्यात जुंपली

| Updated on: Nov 19, 2019 | 1:40 PM

ट्विटरवर सध्या मांत्रिकाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Twitter war of Jitendra Awhad and Ashish Shelar) यांच्यात चांगलीच जुंपली आहे.

जितेंद्र आव्हाड यांना भोंदूबाबा म्हणावं का? मांत्रिकाच्या मुद्द्यावर शेलार आणि आव्हाड यांच्यात जुंपली
Follow us on

मुंबई : ट्विटरवर सध्या मांत्रिकाच्या मुद्द्यावर भाजपचे नेते आशिष शेलार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Twitter war of Jitendra Awhad and Ashish Shelar) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. सोमवारी (18 नोव्हेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस, ठाणे या नावाच्या ट्विटर खात्यावरुन आशिष शेलार यांचा एक फोटो ट्विट करण्यात आला. सोबत आशिष शेलार मांत्रिकाच्या संपर्कात आहेत, असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटल्याचा दावा केला. त्याचा पुरावा म्हणून संबंधित फोटो ट्विट करण्यात आला.

संबंधित फोटोत आशिष शेलार मांत्रिकासारखा वेश धारण केलेल्या व्यक्तीसोबत दिसत होते. त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतः या फोटोविषयी भूमिका मांडत स्पष्टीकरण दिलं आहे. संबंधित व्यक्तीचं नाव फिरोज शाकिर आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “मी बॉलिवूडमधील एक प्रतिष्ठित फॅशन डिझाईनर आहे. मागील 40 वर्षांपासून आशिष शेलार ज्या इमारतीत राहतात तेथेच मीही राहतो. मी तांत्रित नसून एक मुस्लिम फोटोग्राफर आहे याची कृपया नोंद घ्यावी. मी हिंदुत्वात असलेल्या जागतिक शांततेच्या संदेशावर माहितीपट बनवत आहे.”


आशिष शेलार यांनी फिरोज शाकिर यांचं ट्विट रिट्विट करत जितेंद्र आव्हाडांना लक्ष्य केलं. ते म्हणाले, “माझ्या इमारतीमधे राहणाऱ्या एका फॅशन डिझाईनरला, फोटोग्राफरला, मांत्रिक ठरवणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना “भोंदूबाबा” म्हणावे का? असा प्रश्न पडतो. हे सर्व हास्यास्पदच आहे.”


यावर पलटवार करत जितेंद्र आव्हाड यांनी आपण कोणतंही ट्विट किंवा रिट्विट केलं नसल्याचं स्पष्ट केलं. तसंच माझं नाव यात का घेता? असा सवाल आशिष शेलार यांना केला. एकूणच एका अनधिकृत ट्विटर हँडलच्या ट्विटचा आधार घेत आशिष शेलार यांनी आरोप केल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे आशिष शेलार यांनी संबंधित ट्वटर हँडल राष्ट्रवादीचे असल्याचं गृहित धरुन थेट जितेंद्र आव्हाड यांनाच मांत्रिक म्हणावे का? असा सवाल केला.