मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल (Maharashtra Assembly Election Result) लागला आहे. यात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेले नाही. मात्र, निवडणूक पूर्व महायुती असलेल्या भाजप-शिवसेनेकडे (BJP Shivsena fighting for Power) सत्ता स्थापनेसाठीचं स्पष्ट बहुमत आहे. असं असलं तरी शिवसेना या किंगमेकर ठरली आहे. त्यामुळेच शिवसेनेने आपली ताकद वाढवण्यासाठी अपक्ष आमदारांचीही मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून रामटेक आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार आशीष जैस्वाल आणि नरेंद्र गोंडेकर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर भेट घेतली आहे.
निवडणूक निकाल स्पष्ट झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (24 ऑक्टोबर) पत्रकार परिषदेत 15 अपक्ष आमदार आपल्या संपर्कांत असल्याचे म्हटलं होतं. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आपली ताकद जास्त असल्याचाच इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेने देखील हालचाली सुरू केल्या. त्याचाच भाग म्हणून अधिकाधिक अपक्ष आमदार आपल्याकडे असावेत यासाठी जुळवाजुळव सुरू झाली आहे.
शिवसेनेने जागावाटपातील माघारीची भरपाई सत्तेतील वाट्यात करण्याचं ठरवलं असल्याचंही दिसत आहे. म्हणूनच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता 50-50 च्या फॉर्म्युल्यावर तडजोड करणार नसल्याचं म्हणत भाजपला सुचक इशारा दिला आहे. असं असलं तरी सत्तेत किती वाटा मिळणार हे कोणत्या पक्षाकडे किती आमदार यावरच ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे साहजिकच भाजपच्या तुलनेत शिवसेनेची आमदारांची संख्या कमी आहे. म्हणूनच अपक्ष आमदारांना आपल्या सोबत घेण्याची रणनिती शिवसेनेकडून आखली जात आहे.
विशेष म्हणजे रामटेक विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार आशीष जैस्वाल आणि भंडारा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित अपक्ष आमदार नरेंद्र गोंडेकर हे दोघे 2009 मध्ये शिवसेनेचेच आमदार होते. मात्र, यंदा हे मतदारसंघ भाजपकडे गेल्याने जैस्वाल आणि गोंडेकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली. त्यामुळे आपले अपक्ष आमदार आपल्याकडेच ठेवण्यासाठी शिवसेनेने त्यांना सामावून घेण्याचं ठरवलं, असं बोललं जात आहे.