कोलकाता : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. निवडणुकीअगोदर फोडाफोडीचं राजकारणही सुरु झालंय. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का बसलाय. तृणमूल काँग्रेसचा मोठा नेता आणि विद्यमान खासदाराने भाजपात प्रवेश केलाय. शिवाय आणखी पाच खासदारही भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जातंय.
भाजपला धारेवर धरणाऱ्या ममतांसाठी हा दुहेरी धक्का आहे. कारण, एका खासदाराला पक्षातून काढून टाकण्यात आलंय. तर दुसऱ्या खासदाराने भाजपचा झेंडा हातात घेतलाय. भाजपात प्रवेश केल्यानंतर खासदार सौमित्र खान यांनी पश्चिम बंगाल सरकारवर टीका केली. पश्चिम बंगालमध्ये लोकशाही जिवंत नाही, तिथे फक्त पोलीस राज्य आहे, असं ते म्हणाले.
पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि मुकूल रॉय यांच्या उपस्थितीत भाजपचे महासचिव अरुण सिंह यांनी सौमित्र खान यांना भाजपचं सदस्यत्व दिलं. मुकूल रॉय हे देखील टीएमसीतून भाजपात आले आहेत. रॉय यांनी दावा केला की, आणखी पाच खासदार आमच्या संपर्कात आहेत. नावं जाहीर केली नसली तरी हे पाच खासदार लवकरच भाजपात येणार असल्याचं बोललं जातंय.
काही दिवसांपूर्वीच भाजपात आलेले मुकूल रॉय, सौमित्र खान आणि आणखी संपर्कात असलेले पाच खासदार मिळून हा आकडा मोठा होतोय. शिवाय यापैकी अनेक महत्त्वाचे नेते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते राज्य सरकारपर्यंत पश्चिम बंगालमध्ये ममतांची सत्ता आहे.
सौमित्र खान यांनी पक्ष सोडल्यानंतर काही वेळातच दुसरे खासदार अनुपम हाजरा यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. पक्षविरोधी काम केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. या दोघांवरही भ्रष्टाचाराचे आरोप लागल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची हालचाल सुरु करण्यात आली होती.
सौमित्र खान यांच्यामुळे भाजप आणखी मजबूत होणार असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यासाठी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी ताकद पणाला लावली आहे. यासाठी अनेक दिग्गजांना पक्षात प्रवेश देण्यात आलाय. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांनी भाजपात प्रवेश केलाय.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम बंगाल अत्यंत महत्त्वाचं राज्य आहे. कारण, उत्तर प्रदेश (80) आणि महाराष्ट्र (48) या राज्यांनंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणारं पश्चिम बंगाल हे तिसरं राज्य आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूण 42 जागा आहेत. 2014 च्या निवडणुकीत मोदी लाट पश्चिम बंगालमध्ये नव्हती. इथे टीएमसीने 34, काँग्रेसने चार, सीपीएम आणि भाजपने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या.