मुंबई : लखीमपूर हिंसाचार प्रकरणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाची उपमा दिली आहे. उत्तर प्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती आहे, देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही, अशा शब्दात शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. तर लखीमपूर घटनेत भाजपची तालिबानी वृत्ती पाहायला मिळाली. जनरल डायरप्रमाणे भाजपची वागणूक होती, अशी टीका पटोले यांनी केलीय. त्यावर आता भाजप नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Sudhir Mungantiwar’s reply to Sharad Pawar’s criticism on Lakhimpur violence)
काही लोकांना सत्तेपासून वंचित राहावं लागत आहे. म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. लखीमपूरची घटना आणि जालियनवाला बाग हत्याकांड या दोन्ही वेगळ्या घटना आहे. आणि चौकशी केल्याशिवाय अशाप्रकारची प्रतिक्रिया देणं योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात मावळमध्ये शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळ्या झाडल्या होत्या, ते कोण विसरू शकतो, अशा शब्दात मुनगंटीवार यांनी पलटवार केलाय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील पहिले पंतप्रधान आहेत ज्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा केले. अनेक योजनांमधून शेतकऱ्यांना मदत मिळत आहे. नरेंद्र मोदींना त्यांचा पुतण्या किंवा मुलाला आमदार, खासदार बनवायचं नाही. पंतप्रधानांनी देश मेरा परिवार असं सांगितल्याचं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. काल जागतिक स्तरावर सगळं डाऊन होतं. पण यांची खुर्ची, यांचं डोकं आणि बुद्धीही डाऊन झालीय, अशी खोचक टीकाही मुनगंटीवार यांनी पवार आणि पटोलेंवर केलीय.
उत्तर प्रदेशात जालीयनवाला बागसारखी परिस्थिती आहे, देशातील शेतकरी हे कधीही विसरणार नाही. 2 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं जातं, शेतकरी नेत्यांना रोखलं जात, हा सत्तेचा गैरवापर केला जातोय. देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांसोबत असेल. देशातील जनता सरकारला धडा शिकवेल. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण भाजपला यात यश मिळणार नाही. देशातला शेतकरी याच केंद्राला उत्तर देईल. केंद्र असो की राज्य सरकार, या घटनेची संपूर्ण दबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा, आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपवर टीका केलीय.
उत्तर प्रदेशातल्या लखीमपूरमध्ये रविवारी शेतकऱ्यांना चिरडण्यात आलं, या घटनेत आणि यानंतर झालेल्या हिंसाचारात एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात एका स्थानिक पत्रकाराचाही समावेश आहे. ठार झालेल्यांमध्ये 4 शेतकरी, 2 भाजप कार्यकर्ते, 1 अजय मिश्राचा चालक आणि एक स्थानिक पत्रकार यांचा समावेश आहे. या हिंसाचारात ठार झालेल्या 8 जणांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालानुसार, बहुतेक मृत्यू हे जबर मार, शॉक किंवा रक्तस्त्राव झाल्यामुळे झाले आहेत, पोस्टमॉर्टम अहवालात कुणालाही गोळी लागल्याचा उल्लेख नाही.
इतर बातम्या :
हसन मुश्रीफांवर अजून एक गंभीर आरोप, घोटाळ्यात सतेज पाटलांनी मदत केल्याचा दावा!
दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं, सदाभाऊंचा आरोप; शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल
Sudhir Mungantiwar’s reply to Sharad Pawar’s criticism on Lakhimpur violence