मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेना (Shivsena) दुभंगली आहे. त्याचाच परिणाम म्हणून दोन्ही बाजूचे नेते आणि कार्यकर्ते सातत्यानं आमनेसामने येत आहेत. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून एकमेकांवर जहरी टीका केली जातेय. त्याचा परिणाम आज पुण्यातील कात्रजमध्ये पाहायला मिळाला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या सभेच्या परिसरातून शिंदे गटात सहभागी झालेले आमदार उदय सामंत (Uday Samant) यांची गाडी जात होती. त्यावेळी काही शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला चढवला. सामंत यांना असलेल्या सुरक्षेमुळे मोठा अनर्थ टळला. या हल्ल्यावरुन भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. हा हल्ला बाळासाहेबांच्या शिवसैनिकांकडून नाही तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांकडून करण्यात आला. कारण पाठीवर वार करण्याची त्यांना सवयच आहे, असा टोला प्रसाद लाड यांनी लगावलाय.
उदय सामंत यांच्या गाडीवर झालेला खोट्या शिवसैनिकांचा भ्याड हल्ला याचा आम्ही निषेध करतो. हा बाळासाहेबांच्या शिवसैनिकांचा हल्ला नसून उद्धव ठाकरे यांच्या शिवसैनिकांचा हल्ला आहे. हे यावरुन सिद्ध होतं कारण गाडीच्या मागून, पाठीवर वार करण्याचं काम जसं उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी केलं, तसंच काम या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी केलंय. अशाप्रकारच्या धमक्यांना किंवा हल्ल्यांना भाजपचा कार्यकर्ता असेल किंवा बाळासाहेबांचा कार्यकर्ता असेल तो भीक घालत नाही. जशास तसं उत्तर दिलं जाईल. जर अशा प्रकारचा हल्ला पुन्हा झाला तर आमच्या कार्यकर्त्यांकडूनही अशाच प्रकारचं उत्तर आपल्याला मिळेल. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला म्हणता, उद्धवजी ते काम तुमच्या शिवसेनेनं केलं. देवेंद्रजींच्या, मोदीजींच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं आणि 2019 ला काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसलात. उदयजी तुम्ही घाबरू नका, संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, अशा शब्दात प्रसाद लाड यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
असा भ्याड हल्ला करुन कुणाला वाटत असेल की मी शिंदे साहेबांची साथ सोडेन, आमचे 45 लोक शिंदे साहेबांची साथ सोडतील, तर आज या हल्ल्यानं आम्ही होतो त्यापेक्षा जवळ आलो आहोत. असे भ्याड हल्ले करुन उदय सामंत थांबणारा नाही. कुठल्याही प्रसंगाला समोरा जाणारा आहे. कुणावर टीका करत नाही, त्याचा अर्थ मी हतबल नाही. आमच्या सहनशिलतेचा अंत कुणी पाहू नये, असा इशाराच सामंत यांनी हल्लेखोरांना दिलाय.