पुणे : गेल्या 2 ऑगस्टला शिवसेनेचे शिंदे गटातील (Cm Eknath Shinde) बंडखोर आमदार उदय सामंत (Shivsena MLA Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात ठाकरे गटातील शिवसैनिकांकडून हल्ला (Car Attack) चढवण्यात आला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काचही फुटली होती. आम्हाला तानाजी सावंत यांना अडवायचं होतं. मात्र गाडीत उदय सामंत निघाले, अशाही प्रतिक्रिया या हल्ल्यानंतर इथल्या शिवसैनिकांनी दिल्या होत्या. तसेच बंडखोरांना तुम्ही आमदार दिसतील तिथे ठोकणार, असा कडकडीत इशारा दिला होता. त्यानंतर दोन्ही बाजूने राज्यातलं राजकारण पेटून उठलं होतं. दुसऱ्याच दिवशी या हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र या शिवसैनिकांसाठी एक दिलासादायक बातमी आलेली आहे. या प्रकरणातील सहा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना आज कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे.
पुणे सत्र न्यायालयाकडून या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना हा दिलासा देण्यात आलाय. शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला केल्याप्रकरणी शिवसेनेच्या सहा पदाधिकाऱ्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या गुन्ह्यात शिवसेनेचे शहरप्रमुख संजय मोरे, हिंगोलीचे जिल्हा संपर्कप्रमुख बबन नारायण थोरात, राजेश पळसकर, संभाजी थोरवे, सूरज लोखंडे आणि चंदन साळुंके यांनी अटक करण्यात आली होती. तर शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे आणि जिल्हाप्रमुख गजानन थरकुडे यांना न्यायालयाने अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. सामंत यांचे वाहनचालक विराज विश्वनाथ सावंत यांनी याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यावरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांची 2 ऑगस्ट रात्री कात्रज चौकात सभा झाल्यानंतर तेथून जाणाऱ्या सामंत यांच्या वाहनावर जमावाने हल्ला केला होता. ज्या शिवसेनेने यांना मोठं केलं त्याच शिवसेनेची या बंडखोर आमदारांनी साथ सोडून गद्दारी केली आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया यावेळी या शिवसैनिकांकडून देण्यात आल्या होत्या. तसेच तानाजी सावंत यांच्या विरोधातही संताप व्यक्त करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर हा पाठीत वार आहे, म्हणत उदय सामंत यांनी तात्काळ पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली होती, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली होती, त्यानंतर पोलिसांनीही एक्शन मोडमध्ये येत कारवाईला सुरूवात केली होती.