रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर निवडणूक आयोगाकडून (Election Commission) ठाकरे गटाला मशालीचे चिन्ह देण्यात आले आहे. मात्र या चिन्हावर देखील आता बिहारमधील (Bihar) समता पार्टीने दावा केला आहे. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री उदय सामंत यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे, समता परिषदेने तक्रार केली आहे तर त्याचही आम्ही भांडवल करायचं का? काही झालं की शिंदे गटावर बोलायचं हे ठाकरे गटाने बंद करायला हवं. त्यांनी कोर्टात जावं, कुठेही जावं, काय करायचं ते करावं पण धनुष्यबाण हे चिन्ह आमचंच आहे, असं सामंत यांनी म्हटलं आहे.
सामंत यांनी पुढे बोलताना म्हटलं की, काही झालं की शिंदे गटावर बोलायचं हे ठाकरे गटाने बंद करायला हवं. जनता आता या सगळ्याला वैतागली आहे. काही झालं की गद्दार, खोके सरकार, खंजीर खुपसला असं नको ते बोलत असतात असं सामंत यांनी म्हटलं.
दरम्यान सामनामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. या टीकेला देखील सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. सामनातून मुख्यमंत्र्यांवर जी टीका केली आहे त्यावर पहा कोण बोलतंय?, मी सामनाचे धन्यवाद मानतो कारण त्यांनी मान्य तरी केलं की मुख्यमंत्री आठवड्यातून एकदा तरी मंत्रालयात दिसतात. मात्र पूर्वीचे मुख्यमंत्री दिसत तरी होते का?, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.