भूषण पाटील, कोल्हापूर : पक्षाची शिस्तभंग करणाऱ्या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई योग्य की अयोग्य असा वाद सुप्रीम कोर्टात (Supreme court) रंगला असतानाच इकडे निवडणूक आयोगाच्या (Election commissio) निर्णयामुळे ठाकरे (Thackeray) गटातील अनेक आमदार आणि खासदार कोंडीत सापडले आहेत. शिवसेना पक्षाचे हक्क एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यात आल्यामुळे आमदार आणि खासदारांची पदं टांगणीला लागली आहेत. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचीही पदं धोक्यात असल्याचं म्हटलं जातंय. कारण एकनाथ शिंदे यांची शिवसेना असल्याने या पक्षातर्फे दिलेले आदेश पाळणे ठाकरे गटाच्या आमदार आणि खासदारांना बंधनकारक आहे. तो आदेश पाळला नाही तर शिस्तभंगाची कारवाई ठाकरेंसह राऊतांवरही होऊ शकते, असं म्हटलं जातंय. यावरून उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खोचक भाष्य केलंय. शिस्तभंगाची कारवाई कुणावर, कधी होणार, हे लवकरच कळेल. सध्या तरी ते गुपितच ठेवलेलं बरं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ठाण्यातील एकाला शिंदे यांनी माझ्यावर हल्ला करण्याची सुपारी दिल्याचं राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांची या वक्तव्यावरून खिल्ली उडवली जात आहे. उदय सामंत यांनीही अशीच प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ संजय राऊत यांच्याकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो…
उदय सामंत म्हणाले, ‘ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो शिवसेनेच्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला बंधनकारक असेल. महाविकास आघाडी मधील शिवसेना आणि आताची शिवसेना यामध्ये निवडणूक आयोगानेच बदल केले आहेत. शिवसेना म्हणजे आता एकच शिवसेना आहे. आमची युती भाजपसोबत आहे.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात शिवसेना दिल्याने शिवसेनेतील अनेक नेते आणि पदाधिकारी शिंदे यांच्या बाजूने येतील, अशी चर्चा आहे. उदय सामंत यांनी या चर्चेला दुजोरा दिलाय. शिंदे साहेबांकडे येण्यासाठी मोठ मोठ्या नेत्यांचा ओघ वाढलाय, असं सामंत म्हणालेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला उदय सामंत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ आपण त्यात नाही हे दाखवण्यासाठी आणि सरकारला बदनाम करण्यासाठी अशी आंदोलनही करावी लागत आहेत.