सातारा : छत्रपती शिवाजी महाराज यांची जगदंबा तलवार महाराष्ट्रात आणलीच पाहिजे, असं वक्तव्य भाजप खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलंय. ते साताऱ्यात (Satara) पत्रकारांशी बोलत होते. याशिवाय प्रतापगडावरील अफझल खानाच्या (Afzal Khan) कबरीजवळील अनधिकृत बांधकामाच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं. हे अनधिकृत बांधकाम काढलं गेलं पाहिजे, असं मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केलंय. सोबत या कारवाईचं राजकारण करण्याची गरज नाही, असंही ते म्हणाले.
जगदंबा तलावर महाराष्ट्रात आणण्याच्या मागणीवर बोलताना उदयनराजे भोसले यांनी म्हटलं की..
महाराष्ट्रातील प्रत्येकाला वाटतं की जगदंबा तलवार राज्यात आणली जावी. टॉवर ऑफ लंडनमध्ये सध्या ती ठेवली गेली आहे. तिथली सिक्युरीटी मी जाऊन जातीने बघितली आहे. आता डिप्लोमसी म्हणून मोठ्या मनाने बिट्रिश सरकारने त्या त्या देशाला त्यांच्या त्यांच्या ऐतिहासिक ठेवी दिल्या पाहिजेत.
दरम्यान, यावेळी त्यांनी अफझल खान कबरप्रकरणावरही आपलं मत नोंदवलं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात मान सन्मानाच्या बाबतीत कधीच कुणाला कमी केलं नाही. आपल्यावर हल्ला करणाऱ्याची कबर बांधण्याचा विचार दुसऱ्या कुणीही केला नसता. पण महाराजांचे विचार मोठे होते. जो विचार कुणीच केला नसता, तो छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.
या कबरीजवळील बेकायदा बांधकाम काढलं गेलंच पाहिजे. ही कबर नेमकी कशाकरता आहे, त्यामागचा इतिहास काय आहे, हे आताच्या पिढीला कळलं पाहिजे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची साताऱ्यात भेट घेतल्यानंतर उदयनराजे भोसले हे माध्यमांशी बोलत होते.
विशेष म्हणजे या कारवाईवरुन कुणीही गैरसमज करुन घेऊ नयेत, असंही ते म्हणाले. ही कारवाई मुसलमान समाजाच्या विरोधात आहे, हा गैरसमज पसरला जात असून तो चुकीचा आहे. कुणीही असा समज करुन घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.
अफझल खानाची कबर पर्यटनासाठी खुली करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. तसंच कबर हटवण्याची मागणी ज्याच्या त्याच्या बुद्धीप्रमाणे केली जातेय, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
प्रतापगड येथील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडलं जावं, असे आदेश 2016 मध्ये उच्च न्यायालयाने दिले होतं. मात्र आता शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात अखेर हे बांधकाम पाडलं गेलंय. याबाबत प्रश्न विचारला असता या कारवाईला राजकीय रंग लावले जावू नयेत, असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलंय.