पुणेः आज 350 वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांवरचं (Shivaji Maharaj) जनतेचं प्रेम तसूभरही कमी झालं नाही. विविध धर्मियांकडून पुणे बंदला प्रतिसाद मिळाला. शिवरायांबद्दलचं हे प्रेम वाढतच जात असतानाच काही लोकांना महाराजांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी (Maharashtra) काय योगदान दिले समजावून सांगावं लागत आहे. महाराजांचा योग्य सन्मान व्हावा, हे सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे, हीच मोठी शोकांतिका आहे, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje bhosale) यांनी दिली.
पुण्यात आज महाविकास आघाडी तसेच विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांमार्फत कडकडीत बंद पाळण्यात आला. पुण्यात डेक्कन ते लाल महालापर्यंत विविध संघटनांच्या शेकडो कार्यकर्त्यांनी मूक मोर्चा काढला.
असंख्य संघटनांनी पुणे बंदच्या आवाहनाला प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांचे आभार मानले. छत्रपती शिवरायांचा अपमान करणाऱ्या नेत्यांवर तत्काळ कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
लालमहाल परिसरात उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ ३५० वर्ष होऊन देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांवर तेव्हा जे प्रेम होतं, त्याहीपेक्षा जास्त आज दिसून आलं. ज्यावेळी आम्ही रायगडावर गेलो, त्यावेळी खरंच मला वेदना झाल्या. ज्या रायगडावर एकेकाळी सर्वात मोठा सन्मान शिवाजी महाराजांचा झाला, त्याच रायगडावर आम्ही निर्णय घेतला होता.
फुटकळ, तुटपुंजे, विकृत लोकं कारण नसताना विधानं करतात. त्यांच्यामुळे शिवाजी महाराजांनी दिलेलं योगदान कमी होत नाही. पण शिवरायांचा सन्मान झाला पाहिजे, हे सांगण्याची वेळ आमच्यावर आली आहे. यापेक्षा जास्त मोठी शोकांतिका असू शकत नाहीत.
उदयनराजे यांनी यावेळी मागणी केली की भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात ज्या प्रमाणे शिस्तभंगाची कारवाई झाली होती. तशीच कारवाई राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच शिवरायांचा अपमान करणाऱ्यांवर करावी…
पुणे बंदला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल उदयनराजे भोसलेंनी पुणेकरांचे धन्यवाद मानले. पण महाराजांप्रति ही भावना फक्त पुणेकरांचीच नाही तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे आणि तालुक्यांची आहे, असं वक्तव्य उदयनराजेंनी यावेळी केलं.