साताराः सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढतच चाललीय. अनेक राजकीय पक्षांचे नेते पुन्हा एकदा सक्रिय झालेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज कराडमधील राजकीय नेत्यांची भेट घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ॲड. उदयसिंह उंडाळकर यांच्याशी कॅमेराबंद बैठकीनंतर पत्रकारांनी उदयनराजे भोसले यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उदयनराजे स्टॉईलनेच उत्तरे दिली.
जिल्हा बँक निवडणुकीत आता मी ढवळाढवळ करू का, असा इशारा उदयनराजेंनी राष्ट्रवादीसह विरोधकांना दिलाय. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात. आता मी ढवळाढवळ करू का? असा सवाल करत त्यांनी जोरदार फटकेबाजी केलीय. मी माझ्या बंधूंना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही, असं म्हणत त्यांनी शिवेंद्रसिंहराजेंना टोला लगावला.
अजून गाठी भेटी संपायच्या आहेत. सर्व मतदार आहेत. कुठे जायचे ते मी ठरवतो. सर्व समावेशक पॅनेलमध्ये जायचे का नाही ठरवायचेय. मी लोकांच्या सोबत आहे. मी माझ्या बंधूना गेली अनेक दिवस झाले सांगतोय मी तुमच्यासोबत आहे. पण त्यांच्या लक्षात येत नाही. मतदारांनी सांगितले तर फॉर्म विड्रॉ करेन, बाकी कोणाच्या सांगण्याने नाही. मला कधी जिल्ह्यातल्या राजकारणात ढवळाढवळ करताना पाहिले का? पण माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झालाय. 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे, तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागलेत. कोरोना महामारीमुळे जिल्हा बँकेची निवडणूक तब्बल पाच वेळा पुढे ढकलण्यात आली होती. मगील काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्या कमी झाली. त्यामुळे 25 ऑगस्ट रोजी बँकेच्या निवडणुकीवरील स्थगिती उठवण्यात आली. या निर्णयानंतर निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्यासाठी लगबग सुरु झाली होती. आता या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 18 ऑक्टोबपासून 25 ऑक्टोबरपर्यंत ज्यांनी अर्ज दाखल केलेत त्यांना 17 ते 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी पार पडेल. या निवडणुकीत एकूण 1964 मतदार मतदान करतील.
संबंधित बातम्या:
नोटाबंदीच्या घिसडघाईबद्दल केंद्राने देशाची माफी मागावी; संजय राऊत यांची मागणी