सेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली, बाळासाहेबांचा वर का? शिवसेना नाव काढून ‘ठाकरे सेना’ करा : उदयनराजे

| Updated on: Jan 14, 2020 | 1:11 PM

शिवसेना पक्षाला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर थेट हल्लाबोल चढवला

सेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली, बाळासाहेबांचा वर का? शिवसेना नाव काढून ठाकरे सेना करा : उदयनराजे
Follow us on

पुणे : शिवसेना या नावाला कधी आम्ही हरकत घेतली नाही, पण आता शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, असं चॅलेंज माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेला दिलं आहे. दादरमधील शिवसेनाभवनावर शिवरायांचा फोटो खाली आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वर का? असा सवालही उदयनराजेंनी (Udayanraje on Shivsena) केला.

शिवसेना पक्षाला नाव देताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना विचारायला आला होतात का? असा सवाल करत उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर थेट हल्लाबोल चढवला. ‘घड्याळ’वाल्यांची वेळ आता संपत आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेव ‘जाणता राजा’ होते, अशा शब्दात त्यांनी शरद पवारांवरही अप्रत्यक्ष तोफ डागली.

शिवसेना नाव काढून टाका आणि ठाकरे सेना करा, काय प्रॉब्लेम आहे, सरकार तर तुमचं आहे. मला पण बघायचं आहे, नाव बदलल्यावर किती तरुण तुमच्या सोबत राहतात, असं खुलं आवाहन उदयनराजेंनी केलं.

देशभरात वादंग माजलेल्या जय भगवान गोयल यांच्या ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ या पुस्तकावरुन उदयनराजे भोसले यांनी हल्लाबोल केला. यावेळी उदयनराजेंनी गोयल यांच्यावर हल्ला चढवलाच, पण शरद पवार, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरही नाव न घेता हल्लाबोल केला.

जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय, उदयनराजेंचा हल्लाबोल, पवार, ठाकरेंवर घणाघात

या जगात जाणता राजा फक्त छत्रपती शिवराय होते. त्यांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. तसंच शिवसेना भवनावर बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो वर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो खाली का? असा सवाल उदयनराजेंनी उपस्थित केला.

“लोकांनी बुद्धी गहाण ठेवली का ते कळत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांशी कुणाची तुलना होऊ शकत नाही. छत्रपती शिवरायांच्या जवळही जाण्याची कोणाची लायकी नाही”, असं उदयनराजे भोसले म्हणाले.

शिवाजी महाराजांकडे महाराष्ट्राच नव्हे जगातील आदर्श व्यक्ती म्हणून पाहिलं जातं, शिवरायांची तुलना अनेकवेळा झाली. लोकांनी बुद्धी गहाण ठेवलीय का माहित नाही, काल-परवाचं पुस्तक पाहून वाईट वाटलं. गोयल नावाच्या लेखकाने मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी केली, महाराष्ट्रात जाऊ द्या, जगात शिवरायांशी कोणाची तुलना होऊ शकत नाही, असंही उदयनराजे म्हणाले.

शिवाजी महाराजांचं आत्मचरित्र वाचतो, त्यानंतर त्यांच्यासारखं वागायचा प्रयत्न करतो, म्हणून आपण शिवाजी महाराज होऊ शकत नाही. काही गळ्यात बिनपट्टे असणारे लोक लुडबुड करतात. त्यांचं नाव घेऊन मला त्यांना मोठं करायचं नाही, असंही उदयनराजे पुढे म्हणाले.

आम्ही महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. राजेशाही संपल्यावर आम्ही लोकशाही मान्य केली. सर्वधर्मसमभाव ही कल्पना कुठं गेली? जो बिनपट्ट्याचा रस्त्यावर फिरतोय त्याने त्याची लायकी दाखवून द्यावी, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला गेला.

महाशिवआघाडीतलं ‘शिव’ का काढलं? वडापावला ‘शिव’वडा नाव देता. सोयीप्रमाणे भूमिका घेता. प्रकाश गजभिये हा थर्डक्लास आमदार आहे. महाराजांच्या वेशात मुजरा करतो, अशी टीकाही उदयनराजेंनी (Udayanraje on Shivsena) केली.