मुंबई : एवढ्या वर्षांच्या भ्रमातून कसबा (Kasba Peth) बाहेर आला आता देशही बाहेर पडेल, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपाला लगावला आहे. पुण्यातील कसबा पेठ पोट निवडणुकीत भाजपची २८ वर्षांची सत्ता उलथवून देत काँग्रेस उमेदवाराचा विजय झाला. मविआतर्फे येथे काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपच्या हेमंत रासने यांना ११ हजार ४० मतांनी पराभव करत धंगेकर विजयी झाले. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला खडे बोल सुनावले. तसेच सुप्रीम कोर्टाच्या एका मोठ्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलंय. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही विशेष समितीद्वारे व्हावी, असा निर्णय कोर्टाने दिला आहे. या समितीत पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असले पाहिजे, अशा सूचनाही सुप्रीम कोर्टाने दिल्या आहेत.
निवडणूक आयोगावर ताशेरे ओढताना उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक आयोगाने आमच्यावर अन्याय केला. पण सुप्रीम कोर्टाकडू आम्हाला आशा आहे. आज त्या आशेला अंकूर फुटला आहे. कपिल सिब्बल म्हणाले, मी इथे उभा आहे. ते लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी. त्याचं रक्षण चार खांबांनी करावं. कसब्याचा आनंद आहे. एवढ्या वर्षाच्या भ्रमातून कसबा बाहेर पडत असेल तर देशही बाहेर पडेल. शिक्षक आणि पदवीधरचे निकाल बोलके आहेत. या पोटनिवडणुकीत इतक्या वर्षाच्या प्रभावाखालून मतदारांनी वेगळा विचार केला हे आशादायक चित्रं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, ‘ निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. जो निकाल दिला आहे. तो आपल्या देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी दिलासादायक आहे. त्यावर मी भाष्य केलं आहे. लोकशाही ठेवायची असेल तर पक्षांतर्गत लोकशाही जिवंत राहिली पाहिजे असं सांगणाऱ्या निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीची प्रक्रिया बदलली जायची. पूर्वी पंतप्रधानांच्या शिफारशीवरून आयुक्त निवडले जायचे. आता पंतप्रधान, लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश आयुक्तांची राष्ट्रपतींकडे शिफारस करतील. बेबंदशाही रोखली पाहिजे. ती रोखली नाही तर काळ सोकावेल. निवडणूक आयोगावर किती विश्वास ठेवायचा असा काळ असुरू आहे. त्यातील हा निर्णय दिलासादायक आहे….
उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या रणनीतीवर सणकून टीका केली. ते म्हणाले, ‘ भाजपची निती वापरा आणि फेका आहे. ती निती ते सर्वत्र वापरतात. शिवसेनेची आवश्यकता होती तोपर्यंत वापर केला. त्यांनी अकाली दलापासून ममतापर्यंत तेच केलं. टिळक कुटुंबीयांच्या बाबतीतही त्यांनी तेच केलं. गिरीश बापटांसारख्या नेत्याला तब्येत बरी नसतानाही त्यांना प्रचारात आणलं. मनोहर पर्रिकर यांनाही त्यांनी तसंच प्रचारात आणलं होतं. पर्रिकरानंतर त्यांच्या मुलांना बाजूला टाकलं. ही त्यांची प्रवृत्ती आहे. सिलेक्टीव्ह वृत्ती आहे…, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.