पालघर: वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा, असं थेट आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ पालघर लोकसभा मतदारसंघातून केला.
उद्धव ठाकरे यांनी नायगाव बापाणे इथं पहिला रोडशो केला. तिथंच शिवसैनिक महिलांनी त्यांचं आरती ओवाळून स्वागत केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छोटी चौक सभा घेतली. शिवसेना उमेदवार राजेंद्र गावित यांना निवडून आणा आणि महायुतीचा भगवा फडकवण्यासाठी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने काम करा, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.
गुंडगिरी हद्दपार करा
याशिवाय उद्धव ठाकरे यांनी वसईतील फादरवाडी इथंही कोपरा सभा घेतली. युतीचा आणि महायुतीचा धर्म पाळून रेकॉर्डब्रेक मतदान करा, वसई विरारमधील गुंडगिरी हद्दपार करा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
वसई-विरार गुंडगिरीबद्दल मी येणाऱ्या जाहीर सभेत बोलणार आहे, असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला. वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचं वर्चस्व आहे. त्यावरुनच उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी वसईतल्या गुरुद्वारामध्ये दर्शन घेत, वसईतल्या शीख समुदायाशी संवाद साधला आणि युतीला मतदान करण्याचं आवाहन केलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पालघर लोकसभा मतदार संघाच्या प्रचार दौऱ्यात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (प्रकल्प)एकनाथ शिंदे,शिवसेना आमदार रवींद्र फाटक आणि भाजप नेते रवींद्र चव्हाण उपस्थित राहिले.