गजानन उमाटे, नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या (Winter session) अखेरच्या टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग येत आहे. आजच्या घटनांमध्ये एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) हे आमने सामने आले. यावेळी दोहोंदरम्यान शाब्दिक चकमक झाल्याचं सूत्रांनी सांगितलंय. इतकंच नाही तर तुम्ही एवढे निर्दयीपणे आमच्याशी कसे वागू शकतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्याचंही सांगण्यात येतंय.
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची आज दीपक केसरकर यांनी भेट घेतली. या भेटीबद्दलही अनेक चर्चा सुरु आहेत. केसरकरांनी या भेटीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली, यावर खलबतं सुरु आहेत.
या भेटीदरम्यानच उपसभापतींच्या दालनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर हे आमने सामने आले. शिवसेनेतील बंडानंतर केसरकर आणि ठाकरे समोरासमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी केसरकरांना थेटच सवाल केला.
तुम्हाला एवढं मोठं केलं…आम्ही तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयीपणे कसे वागू शकतात, असा सवाल ठाकरे यांनी केला.
दिशा सालियान मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा हात आहे का, हे तपासून पाहण्यासाठी या केसची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी लावून धरली. तर अमरावती येथील उमेश कोल्हे हत्याकांड कुणामुळे झालं, हे दाबण्याचा प्रयत्न तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून झाल्याचा आरोप केला जातोय. याही प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
या दोन्ही चौकशांवरूनच उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना हे सवाल विचारले असावेत, अशी शक्यता आहे.