ठाणे : शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Birthday) यांचा आज वाढदिवस आहे. मात्र उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसादिवशी ही राजकीय वादळ आणि टीका ही काही थांबलेली नाहीये. ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी बॅनरबाजी (Uddhav Thackeray Birthday Banner) करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरवणाऱ्या आशयाचे बॅनर अनेक शहरांमध्ये झळकत आहेत. तर भाजप नेते आणि शिंदे गटांकडून (Cm Eknath Shinde) टोमणे वजा शुभेच्छा वर्षाव उद्धव ठाकरे यांच्या वरती सुरू आहे. मात्र अशातच आता ठाण्यातले वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर हटवल्यावरून वाद पेटण्याची दाट शक्यता आहे. ते बॅनर कुणाच्या दबावाखाली हटवले? अशा चर्चा दाबक्या आवाजात सुरू आहेत.
ठाण्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी बॅनर लागले होते. मात्र हे बॅनर अतिक्रमण विरोधी विभागाकडून उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानसभा क्षेत्रात कोपरी पाचपाखाडीमध्ये येथील उद्धव ठाकरे गटाकडून वाढदिवसाच्या लावण्यात आलेले बॅनर पालिका अतिक्रमण विभागाने उतरवल्याची कारवाई केलेली आहे. कोणाच्या दबाव पोटी हे बॅनर उतरवला? असा सवाल आता ठाकरे गटातले शिवसैनिक विचारत आहेत. तसेच या शिवसैनिकांमध्ये आता नाराजीची लाट पसरली आहे. राजमाता स्पोर्ट्स क्लब आणि प्रदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने हे शुभेच्छांचे बॅनर ठाण्यात लावण्यात आले होते.
संयमाचा महामेरू, हिंदुत्वाचा ज्वलंत योद्धा, मराठी माणसाचा मानबिंदू, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, अशा प्रकारचा मजकूर या बॅनर वरती होता. मात्र हेच बॅनर महापालिका महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढून टाकले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे हे बॅनर ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता यावरून ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसेच या बॅनरबाजी वरून किंवा हे बॅनर हटवल्यावरून राज्यात नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.
भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना टोमणे वजा दिलेल्या शुभेच्छा आणि त्यांच्या नावापुढून शिवसेना पक्षप्रमुख हा काढलेला उल्लेख सध्या महाविकास आघाडीतील नेत्यांच्या टार्गेटवर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत अनेक भाजप नेते आणि शिंदे गटातील नेत्यांवर यावरूनच सडकून टीका होत आहे. त्यामुळे पुन्हा नवा वाद पेटला आहे.