पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी शिवसेनेत बंड करून भाजपशी हात मिळवणी केली आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजप भविष्यात एकत्र येईल की नाही? अशा चर्चा सुरू आहेत. या चर्चांना भाजपचे नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पूर्णविराम दिला आहे. उद्धव ठाकरे आमच्यासोबत यावेत म्हणून आम्ही त्यांच्या दारात जाणार नाही. आम्हाला नवा मित्र मिळाला आहे. हा मित्र म्हणजेच मूळ शिवसेना आहे, असं सांगतानाच उद्धव ठाकरे (uddhav thackeray) आमच्यासोबत यावेत म्हणून आम्ही त्यांच्या दारात जाणार नाही. पण ते आलेच तर आमच्या युतीत त्यांनी डिस्टर्ब करू नये, असा खोचक टोला रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांनी केला आहे. रावसाहेब दानवे हे टीव्ही 9 मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुणगाण गायले.
उद्धव ठाकरे यांनी यावं की नाही यावं हे विचारण्यासाठी आम्ही आता त्यांच्या दारात जाणार नाही. यायचं असेल तर त्यांनी यावं. ज्यांना मागच्या घटनेचा पश्चात्ताप झाला असेल तर त्यांनी यावं. आमची काही त्यांना यायला ना नाही. त्यांनी यावं, आमच्यासोबत राहावं. पण आमच्या युतीत डिस्टर्ब करू नये, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
राजकारणात कोणी कुणाचा कायमचा मित्रं नाही आणि कायमचा शत्रू नाही. 25 वर्ष आम्ही एकत्र राहिलो. 25 व्या वर्षी त्यांना वाटलं भाजपसोबत राहून नुकसान झालं. त्यामुळे त्यांनी आमची साथ सोडली. युतीला लोकांनी मतदान केलं होतं. त्याच्याशी दगाफटका करून त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संधान साधलं. ते आमचे मित्र होते. आता पूर्व मित्र झाले. आता नवीन मित्र जोडले आहेत. आता आमचे मित्र एकनाथ शिंदे आहेत. शिंदे हेच मूळ शिवसेना आहे. आम्ही एकत्र सरकार स्थापन केलं आहे, असं ते म्हणाले.
शिंदे गटाच्या आमदारांनी मैत्री दिनाचं औचित्य साधून उद्धव ठाकरे यांना सोबत येण्याचं आवाहन केलं आहे. त्यावरही रावसाहेब दानवे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मैत्री दिनाच्या दिवशी एकमेकांना वाईट वाटू नये अशाच शब्दांचा वापर केला पाहिजे. शिंदे गटाच्या आमदारांनी अशाच शब्दांचा वापर केला असेल तर त्याचा अर्थ कोणीही वेगळा काढू नये, असं ते म्हणाले.