प्रदीप कापसे, मुंबई : केवळ महाराष्ट्रच नव्हे तर अवघ्या देशाला प्रतीक्षा लागलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी येत्या काही दिवसात होईल. निवडणूक आयोगाकडून (Election commission) प्रचंड निराशा झाल्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना एकमेव आशा सुप्रीम कोर्टाकडून (Supreme court) आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. शिवसेना पक्ष तसेच सत्तांतराचा खटला सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्याने निकाल येईपर्यंत नाव आणि पक्ष चिन्हाविषयीची एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्षाला दिलेलं नाव आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाचा निकाल येईपर्यंत वापरता येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 ला दिली आहे. हे चिन्ह वापरण्याची मुदत आज संपणार आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याआधीच उद्धव ठाकरे यांना आता पुन्हा नव्या चिन्हाच्या आव्हानाला सामोरं जावे लागेल का, अशी चर्चा सुरु होती. मात्र ठाकरे यांना या प्रकरणात तात्पुरता दिलासा मिळाल्याचं दिसतंय.
अंधेरी पोटनिवडणुकीआधीच एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे नाव तात्पुरतं गोठवलं होतं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव आणि मशाल चिन्ह देण्यात आलं होतं. तर एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांची शिवसेना आणि ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आलं होतं. सोशल मीडिया कँपेनिंगचा वापर करत उद्धव ठाकरे यांनी नवं मशाल हे चिन्हं गावा-गावात पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आज २७ मार्च रोजी ठाकरे गटाची नवं नाव आणि चिन्ह वापरण्याची मुदत संपणार आहे.
17 फेब्रुवारी रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाविषयी महत्त्वाचा निर्णय दिला. धनुष्यबाण आणि शिवसेना नाव हे एकनाथ शिंदे गटाला मिळेल असा निकाल देण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. आयोगाने दबावाखाली निकाल दिला असून तो आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका ठाकरेंनी घेतली आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील सुप्रीम कोर्टातील घटनापीठासमोरील सुनावणी संपली आहे. ठाकरे आणि शिंदे गट दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. सुप्रीम कोर्टातून या महाखटल्यावर लवकरच अंतिम निकाल दिला जाण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाला एकमेव आशा असलेल्या या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. तोपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्धव ठाकरे यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.