‘हातचं सोडून पळत्याच्या पाठी धावलात, आता तेही मिळायचं नाही’

| Updated on: Nov 13, 2019 | 2:48 PM

अर्ध सोडून अख्ख्याच्या मागे धावलात, ना अर्ध मिळालं, ना अख्खं, अशा शब्दात उद्धव ठाकरेंवर निशाणा साधण्यात आला आहे.

हातचं सोडून पळत्याच्या पाठी धावलात, आता तेही मिळायचं नाही
Follow us on

भोपाळ : ‘हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणे’ या म्हणीचा प्रत्यय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना येत असेल, असा टोला मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chouhan) यांनी लगावला आहे. सत्तास्थापन करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शिवसेनेवर चौहान यांनी ट्विटरवरुन (Uddhav Thackeray Criticised by BJP) टीका केली.

‘आधी छोड़ पूरी को धावे आधी मिले न पूरी पावे’ अशी हिंदीतील म्हण चौहानांनी ट्विटरवर शेअर केली आहे. याचा अर्थ, अर्ध सोडून अख्ख्याच्या मागे धावलात, ना अर्ध मिळालं, ना अख्खं. यामध्ये उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेचा थेट उल्लेख नसला, तरी साहजिकच उद्धव ठाकरे यांना सत्तासमीकरणं जुळवताना येत असलेल्या अडचणींवर हे भाष्य आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या ट्वीटवर अनेकांनी रिप्लाय करताना शिवसेनेशी संबंध जोडला आहे.

महाराष्ट्रात राज्यपालांच्या शिफारशीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राज्यपालांनी सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचं सांगत शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. ‘हा निर्णय कायदेशीररित्या घेण्यात आला आहे. प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सत्तेत न येण्याची भीती आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींनी कायद्याच्या आधारे निर्णय घेतला आहे.’ असं शिवराज सिंह चौहान यांनी ‘टीव्ही9 भारतवर्ष’शी बोलताना सांगितलं.

काँग्रेससोबत बैठक झाली, चर्चा योग्य दिशेने, निर्णय लवकरच : उद्धव ठाकरे

काँग्रेससोबत बैठक झाली, चर्चा योग्य दिशेने सुरु आहे, निर्णय लवकरच कळेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली. काँग्रेस नेत्यांसोबत आज उद्धव ठाकरे यांची हॉटेल ट्रायडंटमध्ये बैठक होती. 55 मिनिटे चाललेल्या या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. किमान समान कार्यक्रम असावा असं काँग्रेस-राष्ट्रवादीने पूर्वीपासूनच म्हटलं आहे. त्यासाठी दोन्ही पक्षांनी समन्वय समितीसाठी 5-5 जणांची नावं निश्चित केली आहेत. याशिवाय मंत्रिपदांचं वाटप कसं असेल, कोणाला किती आणि कोणती मंत्रिपदं याबाबत चर्चा सुरु आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या शिफारशीनंतर महाराष्ट्रात अखेर राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. मात्र भाजप वगळता उर्वरीत तीन पक्ष आता एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहेत. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत काल पुन्हा एकदा जाहीर केलं. आता तीनही पक्ष किमान सामायिक कार्यक्रम धोरण आखत असून, एकमेकांशी चर्चेच्या वाटाघाटी सुरु (Uddhav Thackeray Criticised by BJP) आहेत.