निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, अलिबाग | 1 फेब्रुवारी 2024 : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. काही दिवसांनी पंतप्रधान अलिबागलाही येतील. झोपडीत राहतील आणि म्हणतील भाई और बहनों… मेरा और समुद्र का बहुत बडा रिश्ता है. ये जो समुद्र हे हो हमारे गुजरातमध्ये देखील येतो, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. याच समुद्रातील व्यापार मोदी तिकडे घेऊन गेले. सगळे विनाशकारी प्रकल्प माझ्या कोकणाला दिले. मोदीजी इकडे आले पानबुडी प्रकल्प गुजरातला गेला. का तुम्ही गुजरात आणि देशात भिंत उभी करत आहात?, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
उद्धव ठाकरे हे रायगडच्या दौऱ्यावर आहेत. अलिबाग येथे झालेल्या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. भाजपला गाडण्यासाठी खड्डा खोदावं लागेल. मताची माती टाकावी लागेल. त्याच्यानंतर ते गाडले जातील. त्यासाठी घराघरात जावं लागेल. गेल्या दहा वर्षात त्यांनी जे अर्थसंकल्प मांडले, 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी ज्या काही थापा मारल्या त्या किती प्रत्यक्षात आल्या ? महिलांना त्यांच्या योजना मिळाल्या का ? तरुणांना नोकऱ्या मिळाल्या का ? शेतकऱ्यांना आपत्ती काळात मदत मिळाली का? याची माहिती जनतेला द्या, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं.
मी मुख्यमंत्री असताना दोन वादळे आली. तोक्ते आणि निसर्ग चक्री वादळ. त्यावेळी मी कोकणात गेलो होतो. तळकोकणात गेलो होतो. केंद्राच्या निकषापलिकडे जाऊन मदत केली होती. दोन वादळे आली. पंतप्रधान आले होते? केंद्राची मदत आली होती? एक पैसाही आला नाही. संकटं आली तेव्हा पंतप्रधान अजिबात फिरकले नाहीत. रायगडमध्ये आणि महाराष्ट्रात जनता राहते. आपल्यामुळे मोदींना सर्वांनी मतदान केलं होतं. पण आपल्या संकटात मोदी फिरकले नाहीत, अशी टीका त्यांनी केली.
राम मंदिर झालं. त्याचा आनंद आहे. राम मंदिर उभारणीत शिवसेनेचं योगदान आहे. मी सांगायची गरज नाही. आमंत्रण येईल, येणार नाही यापेक्षा मी आनंद व्यक्त करण्यासाठी नाशिकला गेलो होतो. काळाराम मंदिराचा इतिहास आहे. महाडचा जसा सत्याग्रह झाला होता. तसाच काळाराम मंदिरासाठी सत्याग्रह झाला होता. राम हा काही तुमची खासगी प्रॉपर्टी नाही हे जसं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. तसंच मी भाजपला सांगतो, हा राम तुमच्या मोदींची प्रॉपर्टी नाही. राम कोरोडो लोकांचा आहे, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
राम मंदिर सोहळ्यात कोणी तरी निर्बुद्ध… कोणी कुणाला काय मानायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी कोणाला देव मानत असेल… तुम्ही मोदींना देव मानता, माना. आमचं काही म्हणणं नाही. पण त्यांची तुलना आमच्या दैवताशी करू नका. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. जे कोणी कुणाशीही तुलना आमच्या महाराजांशी करतात ती माणसं निर्बुद्ध आहेत. त्यांचं महाराजांशी असलेलं एक तरी साम्य दाखवा. छत्रपतींनी आपल्या अज्ञापत्रात म्हटलं होतं, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लागला तरी याद राखा. आज शेतकरी आत्महत्या करतो. आपत्ती काळात मदत मिळत नाही. पीक विमा योजना मिळत नाही. संकटात धावून येईल असं काही होत नाही. जनधन योजनेचं जनगणमन झालंय. त्यात काही मिळतच नाही. ज्या शिवाजी महाराजांनी कोणी असेल रांजाचा पाटील… त्यांनी महिलांची विटंबना केली त्याचे हातपाय छाटून शासन केले. हे शिवाजी महाराज. म्हणून आम्ही म्हणतो शिवशाही. ज्यांच्या बरोबर तुलना करता ते मणिपूरला अजूनही जात नाही. दोन महिलांची विटंबना झाली. काय काय केलं ते अंगावर काटा येतो. बघवतही नाही आणि ऐकवतही नाही. एवढं होऊनही जी व्यक्ती त्याबद्दल बोलायला तयार नाही. तिकडे जायला तयार नाही. त्याची तुलना महाराजांशी होऊ शकते? असा सवाल त्यांनी केला.
जे कुणी कुणाची तुलना कुणाशी करत असतील तर निर्बुद्ध आहेत. बिनडोक आहेत. हा कोणता न्याय आहे? आता एकूण जे राजकारण चाललंय. जागे राहा. जादूचे प्रयोग करतील. कबुतरं उडवतील आणि टोपी तुम्हाला घालतील. उद्या सत्तेत बसल्यावर आपल्याला लाथा मारतील, अशी टीकाही त्यांनी केली.